शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांना आधार लिंकींग प्रक्रिया पूर्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 14:41 IST2020-02-24T14:40:47+5:302020-02-24T14:41:53+5:30
वाशिम जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी केली जात आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांना आधार लिंकींग प्रक्रिया पूर्ण!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ९ हजार शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत. दरम्यान, शनिवार, २२ फेब्रूवारीपर्यंत संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांना आधार लिंकींग करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून सोमवार, २४ फेब्रूवारीपासून पात्र शेतकºयांच्या याद्या कर्जमाफी पोर्टलवर अपलोड करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.
सहकार विभागाच्या नियंत्रणाखाली वाशिम जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. या योजनेकरिता राष्ट्रीयीकृत, सहकारी आणि खासगी बँका निवडण्यात आल्या आहेत. दरम्यान, १ फेब्रूवारी २०२० पासून स्वतंत्र ‘पोर्टल’ कार्यान्वित करून त्याव्दारे संबंधित बँकांना शेतकºयांची माहिती १५ फेब्रुवारीपर्यंत ‘अपलोड’ करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याची चोख अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यातील विविध बँका आणि १०९३ आपले सरकार सेवा केंद्रांवर बायोमेट्रीक पद्धतीने कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या आधार क्रमांकाची पडताळणी करण्यात आली. त्यासाठी प्रशासनाने आपले सरकार सेवा केंद्रांना पुरेसे बायोमेट्रीक उपकरणे देखील उपलब्ध करून दिली होती. याशिवाय जिल्हा मध्यवर्ती बँकेसह इतर राष्ट्रीयीकृत बँकांनी आपापल्या स्तरावर बायोमेट्रीक उपकरणे उपलब्ध केली. तथापि, बायोमेट्रीक पद्धतीने आधार क्रमांकांची पडताळणी आणि कर्जखात्यांना आधार लिंकींग करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता २४ फेब्रूवारीपासून संबंधित पात्र शेतकºयांच्या याद्या कर्जमाफी पोर्टलवर अपलोड करून शासनाच्या पुढील निर्देशानंतर शेतकºयांना कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिंगे यांनी दिली.
१ एप्रिल २०१५ पुर्वी कर्ज घेतलेले शेतकरी अपात्र
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१५ नंतरच्या थकबाकीदार शेतकºयांनाच २ लाखांपर्यंतच्या मर्यादेत कर्जमाफीचा लाभ दिला जात आहे. त्यापुर्वी कर्ज घेतलेले शेतकरी अपात्र ठरले आहेत. अशा शेतकºयांकरिता शासनाने ‘कृषी किरण’ नावाची योजना अंमलात आणली असून बँकांमार्फत त्याचा प्रचार-प्रसार केला जात असल्याचे दिसून येत आहे.
वाशिम जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी प्रभावीरित्या केली जात आहे. याअंतर्गत शेतकºयांच्या आधारची बायोमेट्रीक पद्धतीने पडताळणी आणि कर्जखात्यांना आधार लिंकींगची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता संबंधित पात्र शेतकºयांच्या याद्या कर्जमाफी पोर्टलवर अपलोड केल्या जाणार आहेत.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम