तक्रार निवारण्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’
By Admin | Updated: April 17, 2017 02:24 IST2017-04-17T02:24:28+5:302017-04-17T02:24:28+5:30
महसूल विभाग : १७ ते ३० एप्रिलदरम्यान स्वीकारणार तक्रारी, पीडितांना न्याय देण्याचा प्रयत्न

तक्रार निवारण्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’
वाशिम : नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याच्या दृष्टिकोनातून महसूल विभागाने ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. त्यानुसार १७ ते ३० एप्रिल २०१७ या दरम्यान प्रत्येक तहसील कार्यालय स्तरावर नागरिकांच्या तक्रारी लेखी स्वरुपात स्वीकारल्या जाणार आहेत. या तक्रारींचा निपटारा उपविभाग स्तरावर केला जाणार आहे.
दैनंदिन कामकाज करताना नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. महसूल विभाग व अन्य प्रशासकीय विभागाकडे प्रलंबित कामाबाबत वारंवार पाठपुरावा करूनही काही प्रकरणात न्याय मिळत नाही. पीडितांना न्याय देण्यासाठी आणि प्रलंबित प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्याच्या दृष्टिकोनातून वाशिमच्या महसूल विभागाने ‘अॅक्शन प्लॅन’ आखला आहे. पहिल्या टप्प्यात वाशिम उपविभागातील रिसोड, मालेगाव व वाशिम तालुक्यातील नागरिकांना आपल्या तक्रारी १७ ते ३० एप्रिल या दरम्यान तहसील कार्यालय स्तरावर दाखल करता येणार आहेत. प्राप्त तक्रारीनुसार पीडितांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
जमीनविषयक प्रकरणे, रेशन, दहावी व बारावीनंतर लागणारी विविध कागदपत्रे व प्रमाणपत्रे, प्रलंबित असलेले फेरफार, भूसंपादन झाल्यानंतरही मोबदला न मिळणे, गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले रस्ते व पांदण रस्ते, प्रलंबित कृषीपंप जोडणी, पात्रता असूनही व प्रस्ताव सादर करूनही शासकीय योजनांचा लाभ न मिळणे, यासह प्रलंबित कामांसंदर्भात नागरिकांना या ‘अॅक्शन प्लॅन’च्या माध्यमातून तक्रारी मांडण्यासाठी व्यासपीठ मिळणार आहे. प्रलंबित कामांचा जागेवरच निपटारा करण्यासाठी नागरिकांनी १७ ते ३० एप्रिलदरम्यान तहसील स्तरावर लेखी स्वरूपात तक्रारी दाखल करणे आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यात वाशिम उपविभागात अंमलबजावणी होणार असून, त्यानंतर मंगरूळपीर व कारंजा उपविभागात याच पद्धतीने कार्यवाही होणार आहे.
पालकमंत्र्यांच्या सूचनांची अंमलबजावणी
वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी नुकतीच जिल्हास्तरीय शासकीय विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली होती. यावेळी ना. राठोड यांनी नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यासाठी निश्चित कार्यक्रम आखण्याच्या सूचना दिल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारी कोणत्या स्वरुपाच्या आहेत, या तक्रारींचा निपटारा कसा करता येईल, या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना ना. राठोड यांनी केल्या होत्या. त्यानुसार महसूल विभागाने अॅक्शन प्लॅन तयार करून १७ एप्रिलपासून तक्रारी स्वीकारण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे.