वाशिमच्या जंगलात ४० कृत्रिम पाणवठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 17:51 IST2019-04-19T17:51:29+5:302019-04-19T17:51:36+5:30
वनविभागाच्यावतीने जिल्हाभरातील जंगलात प्राथमिक टप्प्यात ४० कृत्रिम पाणवठे ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे.

वाशिमच्या जंगलात ४० कृत्रिम पाणवठे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील जंगलात पाणी नसल्याने वन्यप्राणी लोकवस्तीत धाव घेत आहेत. त्यामुळे त्यांचा जीव संकटात येत असून, यावर नियंत्रणासाठी वनविभागाच्यावतीने जिल्हाभरातील जंगलात प्राथमिक टप्प्यात ४० कृत्रिम पाणवठे ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात हे पाणवठे जंगलात विविध ठिकाणी ठेवण्यात येतील.
वाशिम जिल्ह्यात प्रादेशिक जंगलाचा भाग मोठा आहे. या जंगलात विविध प्रजातींच्या हजारो प्राण्यांचा अधिवास आहे. तथापि, या जंगलात पुरेशा प्रमाणात पाणीसाठे नसल्याने हिवाळ्यापासूनच वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू होते. हे प्राणी सुरुवातीला शेतशिवारात आणि नंतर उन्हाळ्यात थेट लोकवस्तीपर्यंत धाव घेतात. पाण्यासाठी होत असलेली वन्यप्राण्यांची भटकंती त्यांच्या जिवाला धोका निर्माण करते. कधी वाहनांची धडक लागून, तर कधी मानव-वन्यजीव संघर्षामुळे अनेक प्राण्यांना जीवही गमवावा लागला. हे प्रकार दिवसेंदिवस वाढतच असून, यावर नियंत्रणासाठी वनविभागाने जंगलात कृत्रिम पाणवठे ठेवण्याची तयारी केली आहे. यासाठी आवश्यक निधीची तरतूद पूर्वीच झाली असून, सिमेंटचे हे पाणवठे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. साधारण पाच फुट लांब रुंद आणि दोन फुट खोल, तसेच चार फुट लांब, दोन फुट रुंद आणि दोन फुट खोल अशा आकाराचे हे पाणवठे जंगलातील आवश्यक ठिकाणी ठेवले जाणार असून, त्यात पाणी भरण्याची काळजी घेण्यात येणार आहे.
वन्यप्राण्यांची पाण्यासाठी सुरू असलेली भटकंती थांबविण्यासाठी जंगलात कृत्रिम पाणवठे ठेवण्यात येणार आहेत. प्राथमिक टप्प्यात ४० पाणवठे तयार करण्यात येत असून, त्याशिवाय पुढील काळात इतरही आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येतील.
-सुमंत सोळंके
उपवनसंरक्षक
वाईल्ड लाईफ (वाशिम)