वाशिम जिल्ह्यातील टंचाईग्रस्त २५ गावांना टँकरची प्रतीक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 17:34 IST2018-04-25T17:34:28+5:302018-04-25T17:34:28+5:30
वाशिम: २०१७ मधील पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील ५१० गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने आतापर्यंत ४८ टँकर सुरू केले असून, अद्याप जवळपास २५ गावांत टँकरची प्रतीक्षा आहे.

वाशिम जिल्ह्यातील टंचाईग्रस्त २५ गावांना टँकरची प्रतीक्षा !
वाशिम: २०१७ मधील पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने वाशिम जिल्ह्यातील ५१० गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने आतापर्यंत ४८ टँकर सुरू केले असून, अद्याप जवळपास २५ गावांत टँकरची प्रतीक्षा आहे.
गतवर्षी पावसाळ्यात पुरेशा प्रमाणात पाऊस पडला नाही तसेच पावसात सातत्य नसल्याने जलप्रकल्प आणि भूजल पातळीतही समाधानकारक वाढ होऊ शकली नव्हती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्वाधिक गावांत पाणीेटंचाई निर्माण झाली. पाणीटंचाईग्रस्त गावांत उपाययोजनेचा एक भाग म्हणून विहिर अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा, तात्पुरती नळ योजना यासंदर्भात दिरंगाई करू नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत. तथापि, पाणीटंचाईचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरच काही दिवस धूळखात पडत असल्याने संबंधित गावांत टँकर सुरू झाले नाहीत. विहिर अधिग्रहण करण्याचा वेग मात्र त्या तुलनेत अधिक आहे. जिल्ह्यात एकूण ४९१ विहिरींचे अधिग्रहण करण्याचे प्रस्तावित आहे. विहिर अधिग्रहीत केल्यानंतर तेथे ‘अधिग्रहित विहिर’ असा फलक लावण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत. ग्रामपंचायत स्तरावरून टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसात प्रत्यक्ष कार्यवाही व्हावी, अशी मागणी सरपंच संघटनेचे वाशिम तालुकाध्यक्ष दीपक खडसे यांनी बुधवारी केली. टँकरचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याची मागणीही खडसे यांनी केली.