पोहरादेवी यात्रेसाठी अकोला विभागातून २० बसफेऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 15:34 IST2018-03-24T15:34:42+5:302018-03-24T15:34:42+5:30
वाशिम: बंजारा बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पोहरादेवी येथे रामनवमीच्या औचित्यावर संत सेवालाल महाराजांची भव्य यात्रा भरते. भाविकांना प्रवासाची सुविधा म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) अकोला विभागाकडून २० बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.

पोहरादेवी यात्रेसाठी अकोला विभागातून २० बसफेऱ्या
वाशिम: बंजारा बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पोहरादेवी येथे रामनवमीच्या औचित्यावर संत सेवालाल महाराजांची भव्य यात्रा भरते. यंदा २५ मार्च रोजी हा उत्सव सोहळा होत असून, या ठिकाणी देशभरातील बंजारा बांधव दर्शनासाठी येत असतात. या भाविकांना प्रवासाची सुविधा म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) अकोला विभागाकडून २० बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.
मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे दरवर्षी रामनवमीच्या औचित्यावर संत सेवालाल महाराजांच्या यात्रोत्सवासाठी देशभरातील भाविक २३ मार्चपासूनच पोहरादेवी येथे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण बंजारा बांधवांचे दैवत असलेल्या सेवालाल महाराजांच्या यात्रेसाठी ५ लाख भाविक या ठिकाणी दाखल होत असतात. या भाविकांना प्रवासात अडचणी येऊ नयेत म्हणून एसटी महामंडळाच्यावतीने दरवर्षी जादा बसेसची व्यवस्था केली जाते. यवतमाळ, अमरावती, नांदेड, हिंगोली, परभणी आणि वाशिमसह खान्देशातील विभागाकडूनही या यात्रेसाठी जादा बसेस सोडल्या जातात. यावेळी अकोला परिवहन विभागाक डूनही या यात्रेसाठी २० जादा बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मंगरुळपीर आगारातून सर्वाधिक ७, वाशिम आगारातून ५, कारंजा आगारातून ३, रिसोड आगारातून २, अकोला १ आगारातून २ आणि अकोला २ आगारातून १, अशा बसफेऱ्याचा समावेश आहे. दरम्यान, पोहरादेवी येथे भाविकांची होत असलेली गर्दी लक्षात घेऊन अकोला विभागाच्यावतीने बसफेऱ्या वाढविण्याचीही तयारी करण्यात आली असल्याची माहिती अकोला विभाग नियंत्रक राहुल पलंगे यांनी दिली आहे.