ब्रिटिश कौन्सिलच्या पश्चिम वर्हाडात १0४ शाळा
By Admin | Updated: June 10, 2015 02:53 IST2015-06-10T02:53:58+5:302015-06-10T02:53:58+5:30
सर्वसामान्य पालकांची मुलेही होताहेत इंग्रजीमध्ये पारंगत.

ब्रिटिश कौन्सिलच्या पश्चिम वर्हाडात १0४ शाळा
सुनील काकडे / वाशिम: नगर परिषद, जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्याकरिता ब्रिटिश कौन्सिल नामक धर्मदाय संस्थेने पश्चिम वर्हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांमधील १0४ शाळा दत्तक घेतल्या आहेत. यामुळे महागड्या शाळांचे शुल्क न परवडणार्या सर्वसामान्य पालकांची मुलेही इंग्रजी विषयांत पारंगत होत असल्याचे आशादायी चित्र दिसून येत आहे.
एकीकडे इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणार्या कॉन्व्हेंटची संख्या वाढत असताना दुसरीकडे मात्र नगर परिषद आणि जिल्हा परिषदांच्या शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस पडत आहेत.
शासनाच्या अखत्यारित असणार्या या शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावत चालल्याची ओरड सर्वच स्तरांतून होत आहे. अशा स्थितीत गेल्या २ वर्षांपूर्वी ब्रिटिश कौन्सिल नामक धर्मदाय संस्थेने सर्वसामान्य तथा गोरगरिब कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही इंग्रजीमधून शिक्षण मिळावे, या उदात्त हेतूने पश्चिम वर्हाडातील अनेक शाळांचा सर्व्हे केला. त्यातून काही ठराविक शाळांची निवड करण्यात आली. याअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील नगर परिषद, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ४0 शिक्षकांना ब्रिटिश कौन्सिलच्या तज्ज्ञ चमूने प्रशिक्षण दिले.
तद्नंतर नगर परिषदेच्या १३, जिल्हा परिषदेच्या ९ आणि खासगी शाळा ८ अशा एकंदरित २९ शाळांमध्ये ब्रिटिश कौन्सिलने निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमाचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. अकोला जिल्ह्यातील इयत्ता पहिली आणि दुसरीमध्ये शिक्षण घेणार्या सर्व विद्यार्थ्यांना इंग्रजीतून शिक्षण दिले जात आहे. त्यापैकी जवळपास ३५ शाळांमध्ये ब्रिटिश कौन्सिल धर्मदाय संस्थेच्या अभ्यासक्रमाचे धडे दिले जात असल्याची माहिती महानगर पालिकेच्या शिक्षणाधिकारी शाहीन सुलतान यांनी लोकमतला दिली. बुलडाणा जिल्ह्यातही शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचे अपेक्षित प्रयत्न सुरु आहेत.
शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात आले असून जिल्हा परिषद प्राथमिक ३१, विद्यालय ४ आणि नगर परिषदेच्या २ अशा ३७ शाळांमध्ये ब्रिटिश कौन्सिल अंतर्गत विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे धडे दिले जात आहेत. एकूणच या उपलब्धीमुळे कॉन्व्हेंटच्या संस्कृतीत भरडल्या जाणार्या सर्वसामान्य तथा गोरगरिब पालकांनाही चांगल्या दर्जाच्या शिक्षणाची कवाडे खुली झाल्याने त्यांच्यात समाधान व्यक्त होत आहे.