१ लाख २५ हजार विद्यार्थ्यांच्या खात्यात येणार खिचडीची रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 12:16 IST2021-06-28T12:16:01+5:302021-06-28T12:16:07+5:30
1 lakh 25 thousand students will get the amount of khichdi : उन्हाळ्यात शाळांना सुटी असली तरी सुटीच्या कालावधीतही पोषण आहार वाटप करणे बंधनकारक असते.

१ लाख २५ हजार विद्यार्थ्यांच्या खात्यात येणार खिचडीची रक्कम
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शालेय पोषण आहार योजनेंतर्गत यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शिजवलेल्या आहाराऐवजी धान्य वितरित करण्यात आले. यंदाच्या उन्हाळी सुटीतील पोषण आहार धान्याचे वितरण झाले नसून, आता या कालावधीतील पोषण आहाराच्या धान्याऐवजी थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर पोषण आहाराची रक्कमच जमा केली जाणार आहे. जिल्ह्यातील १ लाख २५ हजार १८५ विद्यार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे.
उन्हाळ्यात शाळांना सुटी असली तरी सुटीच्या कालावधीतही पोषण आहार वाटप करणे बंधनकारक असते. त्यातच यंदा शाळा बंद असल्याने काही काळ आहाराऐवजी धान्य वितरित करण्यात आले, तर उन्हाळ्यात धान्य वाटपही करणे शक्य झाले नाही.
आता या आहाराचे पैसे थेट लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँकखात्यात टाकले जाणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्याची माहिती तयार ठेवण्यात यावी, ज्यांचे बँक खाते अद्याप उघडले गेले नाही, अशा विद्यार्थ्यांचे खाते उघडण्यासाठी शाळांनी सहकार्य करावे, असे आदेश शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी शुक्रवार २५ जून रोजी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्ह्यातील ११२० शाळांतील १ लाख २५ हजार १८५ विद्यार्थ्यांच्या खात्यात उन्हाळी सुटीतील पोषण आहाराची रक्कम जमा होणार आहे.
प्रति विद्यार्थी २०० ते ३०० रुपये
उन्हाळी सुटीत पोषण आहाराचे धान्य वितरित करणे शिक्षण विभागाला शक्य होऊ शकले नाही. त्यामुळे आता या कालावधीतील पोषण आहार धान्य वितरणाऐवजी विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट या आहाराची रक्कमच जमा करण्यात येणार असून, या योजनेंतर्गत प्रती विद्यार्थी २०० ते ३०० रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे. त्यातच यंदाही शाळा ऑनलाईनच असून, २०२१-२२ या शैक्षणिक सत्रातील पोषण आहाराऐवजी धान्य मिळणार की डीबीटीद्वारे विद्यार्थ्यांच्या खात्यात पोषण आहाराची रक्कम जमा होणार, याबाबत संभ्रम कायम आहे.
उन्हाळी सुट्यात विद्यार्थ्यांना पोषण आहारातील धान्याचे वितरण करणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांच्या खात्यात या कालावधीतील पोषण आहाराची रक्कम जमा करण्याचे ठरले आहे. अद्याप यासाठी निधी उपलब्ध झाला नाही. तथापि, शाळास्तरावर विद्यार्थ्यांच्या उपलब्ध आधार लिंक बँकखात्याची पडताळणी क रण्यासह खाते नसलेल्या विद्यार्थ्यांचे खाते उघडण्याबाबत पालकांना सुचना देण्यात येणार आहेत.
- गजाननराव डाबेराव,
प्र. उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. वाशिम