गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू, धक्का बसलेल्या वडिलांनीही सोडले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 16:00 IST2022-10-03T15:59:12+5:302022-10-03T16:00:31+5:30
Navratri : गरबा खेळताना एका तरुणाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला. तर डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या वडिलांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचेही निधन झाले.

गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू, धक्का बसलेल्या वडिलांनीही सोडले प्राण
- मंगेश कराळे
नालासोपारा - विरारमध्ये सोसायटीच्या आवारात गरबा खेळताना एका तरुणाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला आहे. तर डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या वडिलांनाही हृदयविकाराचा झटका आला. या घटनेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच वडील व मुलाचे निधन झाले आहे.
विरारच्या ग्लोबल सिटीतील एव्हरशाईन अवेन्यू या सोसायटीमध्ये नवरात्रोत्सव साजरा केला जात होता. शनिवारी रात्री गरबा खेळताना मनीष जैन (३५) या तरुणाला अस्वस्थ वाटल्यानंतर उलटी झाली. त्याला उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यावर मेडिकलच्या समोरच मनिष हा जमिनीवर पडला. हे रिक्षातून आलेले त्याचे वडील नरपत जैन (६५) यानांही रिक्षातच चक्कर आली. नातेवाईक आणि इमारतींमधील नागरिकांनी दोघांना संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेल्यावर तेथील डॉक्टरांनी तपासून हृदयविकाराचा झटक्याने दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेमुळे इमारतींमधील नागरिक व जैन परिवार, नातेवाईक यांच्यावर शोककळा पसरली आहे. जैन कुटुंबांचा सोन्याचे दागिने खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. मनीषचे तीन महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. अर्नाळा पोलिसांनी रविवारी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.