Virar Local : Virar Local became 153 years old, then the only train to leave | Virar Local : विरार लोकल झाली १५३ वर्षांची, तेव्हा सुटायची एकच गाडी 

Virar Local : विरार लोकल झाली १५३ वर्षांची, तेव्हा सुटायची एकच गाडी 

- सुनील घरत

पारोळ :  मुंबईशी वसई-विरारकरांना  जोडणारी लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असलेली विरारलोकल सोमवारी १५३ वर्षांची झाली. मात्र, या ऐतिहासिक दिवसाची अनेक प्रवाशांना योग्य ती माहितीच नसल्याचे दिसून आले.
१२ एप्रिल १८६७ रोजी विरारहून पहिली लोकल धावली होती. तेव्हा केवळ एकच गाडी पहाटे ६.४५ वाजता विरारहून सुटायची आणि सायंकाळी ५.३० वाजता तीच गाडी परतीचा प्रवास करायची. महिलांसाठी ट्रेनमध्ये वेगळा दुसऱ्या श्रेणीचा डबा होता. याव्यतिरिक्त एक स्मोकिंग झोनही होता. त्या काळी या ट्रेनमध्ये तीन श्रेणी होत्या. लोक सामान्यत: दुसऱ्या श्रेणीने प्रवास करायचे. प्रतिमैलाचा दर होता 
७ पैसे ! तिसऱ्या श्रेणीसाठी दर होता 
३ पैसे. त्यावेळी चर्चगेट ते विरार हा प्रवास आज या प्रवासाला लागणाऱ्या वेळेपेक्षा कमी वेळेत पूर्ण होत असे, कारण या मार्गावर मधील स्थानके कमी होती. नीअल (नालासोपारा), बसीन (आमची वसई), पाणजू (वसईच्या दोन खाड्यांमधले स्थानक), बेरेवाला (बोरीवली), पहाडी (गोरेगाव), अंदारु (अंधेरी), सांताक्रूझ, बंदोरा (बांद्रा), माहिम, दादुरे (दादर), ग्रांट रोड हीच स्थानके तेव्हा होती. दरम्यान, रेल्वेच्या इतिहासात १६ एप्रिल १८५३ या दिवसाला अधिक महत्त्व आहे. कारण या दिवशी ठाणे ते बोरीबंदर ट्रेन - देशातली पहिली ट्रेन धावली होती; पण ती लोकल नव्हती. लोकल हा शब्द ट्रेनच्या इतिहासात पहिल्यांदा १ फेब्रुवारी १८६५ रोजी निघालेल्या वेळापत्रकात वापरण्यात आला. 

Web Title: Virar Local : Virar Local became 153 years old, then the only train to leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.