Virar Covid hospital Fire: आक्रोश....आई द्या हो, मला माझे बाबा हवेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 05:13 IST2021-04-24T05:13:24+5:302021-04-24T05:13:42+5:30
रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा टाहो. जळीतकांडात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या आक्रोशामुळे रुग्णालय परिसरात शोकाकुल वातावरण होते.

Virar Covid hospital Fire: आक्रोश....आई द्या हो, मला माझे बाबा हवेत!
सुनील घरत
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळ : विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात होरपळून मृत्यू झालेल्या १३ रुग्णांच्या आप्तेष्ट व नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. ‘मला माझे बाबा हवेत, मला आई द्या हो, माझा भाऊ कुठे आहे, काल मी भेटलो, फोनवर रात्री बोललो, दोन दिवसांत आई बरी होऊन घरी येणार होती. असे का झाले?’ असा टाहो नातेवाईकांनी फोडला, तेव्हा ऐकणाऱ्यांचे डोळे आपसूक पाणावले.
जळीतकांडात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या आक्रोशामुळे रुग्णालय परिसरात शोकाकुल वातावरण होते. नातेवाईकांनी रुग्णालयाच्या कारभारावर रोष व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच मृतांचे कुटुंबीय व नातेवाईक यांनी गर्दी करत आपला रुग्ण कसा आहे याची चौकशी केली. पण, सकाळी त्यांना रुग्णालय प्रशासनाने कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. मृतांची नावे समोर येताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.
कुणी वडिलांना गमावले होते, तर कुणी आईला. काही कुटुंबांनी आपला आधारच गमावला. हे सर्व कुटुंबीय धाय मोकलून रडत होते. शोकमग्न कुटुंबीयांना त्यांचे काही जवळचे नातेवाईक धीर देताना दिसून आले.
रुग्णालयावर रोष
nकाही कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर रोष व्यक्त करत ५० हजार भरा, रुग्णांसाठी इंजेक्शन आणा, औषध आणा, असे रुग्णालयाकडून सांगण्यात येत असल्याचे सांगितले.
nआम्ही पैसे दिले असतानाही आमच्या रुग्णांची काळजी का घेतली नाही, असा संतप्त प्रश्नही नातेवाईकांनी केला.
nमृत रजनी कुडू यांचा मुलगा सचिन कुडू यांनी या रुग्णालयाला फक्त पैसे पाहिजे असल्याचे प्रसिद्धिमाध्यमांसमोर बोलताना सांगितले.