वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 07:33 IST2025-08-15T07:32:35+5:302025-08-15T07:33:15+5:30
२९ गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा

वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
नालासोपारा : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दवाढीवर राज्य शासनाने अखेर शिक्कामोर्तब केले आहे. परिसरातील २९ गावांचा वसई-विरार पालिकेत समावेश करण्याचा अंतिम निर्णय राज्य शासनाने घेतला असून नगरविकास विभागाने गुरुवारी याबाबतची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली. या निर्णयामुळे महापालिकेच्या क्षेत्रात मोठी वाढ होणार असून, त्यात दीर्घकालीन संघर्ष करणाऱ्या २९ गावांचा समावेश होणार आहे. या गावांच्या नियोजनबद्ध विकासाचा मार्गही या निर्णयामुळे मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अधिकारांचा वापर करून शासनाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी २४ फेब्रुवारी २०२४ रोजी या गावांचा समावेश करण्यासंदर्भात प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध करून नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. यावर कोकण विभागीय आयुक्तांमार्फत सुनावणी घेण्यात आली आणि त्यांचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता.
पश्चिमेला अर्नाळा सागरी किनाऱ्यापर्यंत सीमा
या हद्दवाढीमुळे वसई-विरार महानगरपालिकेच्या सीमा लक्षणीयरीत्या विस्तारल्या आहेत. पालिकेच्या नव्या सीमा उत्तरेला वैतरणा खाडीपर्यंत, दक्षिणेला सासुनवघर आणि वसईच्या खाडीपर्यंत, पूर्वेला पेलार, चिंचोटी गावांच्या सीमेपर्यंत आणि पश्चिमेला अर्नाळा सागरी किनाऱ्यापर्यंत पोहोचल्या आहेत.
ही अधिसूचना राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने काढण्यात आली असून, यामुळे वसई-विरार परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. या गावांचा पालिकेत समावेश झाल्यामुळे येथील नागरिकांना अधिक चांगल्या पायाभूत सुविधा आणि नियोजनबद्ध विकास मिळण्याची अपेक्षा आहे.
पालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेली गावे
आगाशी, नबाळे, कसराळी, कोपरड, निर्मळ, कोशिंबे, वाघोली, चिंचोटी, ससूनवघर, दहिसर, देवदळ, भुईगाव बु., नाळे, कामण, भुईगाव खु., रांजोडी, कनेर, गास, वटार, कोल्ही, गिरीज, चांदीप, मांडवी, कौलार बु., कशीद, कोपर, शिरसाड, कौलार खु., सालोली