इमारत कोसळून १७ निष्पाप नागरिकांच्या बळी गेल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्तांना झाली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 10:35 IST2025-12-05T10:35:02+5:302025-12-05T10:35:29+5:30
पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी या प्रकरणाचा तपास हा गुन्हे शाखा युनिट-३ कडे सोपविला होता.

इमारत कोसळून १७ निष्पाप नागरिकांच्या बळी गेल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्तांना झाली अटक
मंगेश कराळे
नालासोपारा - १७ निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या इमारती विरोधात विहित मुदतीत कारवाई न केल्यामुळे सहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्साल्विस यांना अखेर अटक करण्यात आली आहे. बेकायदेशीर व धोकादायक असलेली इमारत खाली न करता सदर प्रकरणी एमआरटीपी ऍक्ट अंतर्गत गुन्हा न दाखल केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
माहितीनुसार, विरार पूर्वेस विजयनगर परिसरात असलेली रमाबाई अपार्टमेंट ही ४ मजली इमारत २६ ऑगस्ट २०२५ रोजी कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता. तर ९ जण जखमी झाले होते. ऐन गणेशोत्सवात घडलेल्या दुर्घटनेने संपूर्ण शहर हादरले होते. रमाबाई अपार्टमेंट ही ४ मजली अनधिकृत इमारत होती. यात ५० सदनिका होत्या. मात्र अवघ्या काही वर्षातच ही इमारत जीर्ण झाली होती. विकासकाने इमारतीच्या रहिवाशांची दिशाभूल करून इमारत अधिकृत असल्याचे भासवले होते. त्यामुळे रहिवाशी कर भरत होते. या दुर्घनटेनंतर पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक नितल साने आणि जागा मालकासह ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी या प्रकरणाचा तपास हा गुन्हे शाखा युनिट-३ कडे सोपविला होता. या प्रकरणात पोलिसांनी विकासकासह पाच आरोपींना अटक केली होती. त्यापैकी चार आरोपींना जामीन मिळाला आहे. या प्रकरणाची चौकशी करत असतानाच गुन्हे शाखा युनिट ३ ने आता मनपाच्या प्रभाग (सी) चे सहायक आयुक्त गिल्सन गोन्साल्विस यांनी सदर इमारत धोकादायक असतानाही ती रिकामी न करता विकासका विरोधात गुन्हा दाखल न केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पोलिसांनी गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. त्यांनी वसई न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता पण त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला नव्हता.