वसई रोड येथील कोचिंग टर्मिनसला गती; पश्चिम रेल्वे पुढच्या महिन्यात निविदा काढणार; नवीन टर्मिनस जून २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 14:02 IST2025-08-08T14:01:06+5:302025-08-08T14:02:56+5:30
हे नवीन टर्मिनल उत्तर आणि दक्षिण दोन्ही दिशांवरून येणाऱ्या गाड्यांचे आगमन आणि निर्गमन हाताळण्यास सक्षम असेल.

वसई रोड येथील कोचिंग टर्मिनसला गती; पश्चिम रेल्वे पुढच्या महिन्यात निविदा काढणार; नवीन टर्मिनस जून २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या वसई रोड स्थानकावरील प्रस्तावित कोचिंग टर्मिनसच्या उभारणीसाठी पुढच्या महिन्यात निविदा काढण्यात
येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकल्पाला १७ मार्च २०२५ रोजी औपचारिक मान्यता देण्यात आली होती.
रेल्वेच्या बांधकाम विभागाने जून २०२७पर्यंत या टर्मिनलचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या, अभियांत्रिकी स्केल प्लॅन अंतिम करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. जवळजवळ सर्व शाखा अधिकाऱ्यांनी अभियांत्रिकी स्केल प्लॅनला मान्यता दिली आहे आणि
येत्या आठवड्यात विभागीय स्तरावरून त्याची औपचारिक मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे.
सॉर्टिंग लाइन्सवर विकास
वसईवरून दक्षिण भारताकडे एक्स्प्रेस चालवण्याची वाढती मागणी आणि वसई रोड-पनवेल दरम्यान मेमू/ईएमयू सेवांच्या वाढत्या मागणीमुळे लोकप्रतिनिधींकडून या ठिकाणी टर्मिनस उभारण्यासाठी रेल्वेवर सतत दबाव आणला जात होता. हे लक्षात घेता, पूर्व यार्डमध्ये असलेल्या विद्यमान सॉर्टिंग लाइन्सवर या नवीन टर्मिनलचा विकास प्रस्तावित आहे.
आपत्कालीन परिस्थितीत मोठा दिलासा
हे नवीन टर्मिनल उत्तर आणि दक्षिण दोन्ही दिशांवरून येणाऱ्या गाड्यांचे आगमन आणि निर्गमन हाताळण्यास सक्षम असेल.
आपत्कालीन परिस्थितीत, वांद्रे टर्मिनस किंवा मुंबई सेंट्रलच्या मुख्य मार्गावरील गाड्या येथून थांबवता येतात किंवा पाठवता येणे शक्य होईल.
वसई रोड स्टेशनच्या प्लॅटफॉर्म आणि आसपासच्या परिसराच्या विकासासाठी निविदा कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत. या कामाची निविदा पुढील महिन्यापर्यंत जारी केली जाईल.
स्कायवॉक आणि फूटओव्हर ब्रिजच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरू होईल, असे रेल्वेचे अधिकारी म्हणाले.