वाढवणकर संतप्त; घोषणा अन् धक्काबुक्की, ग्रामस्थांचा रास्ता रोको
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 10:09 IST2025-10-12T10:07:58+5:302025-10-12T10:09:28+5:30
बंदराचे सर्वेक्षण रोखले; महिला आक्रमक झाल्याने परिसरात तणाव...

वाढवणकर संतप्त; घोषणा अन् धक्काबुक्की, ग्रामस्थांचा रास्ता रोको
डहाणू : प्रस्तावित वाढवण बंदराला भूमिपुत्रांचा प्रचंड विरोध आहे. असे असताना आयटीडी कंपनीने पोलिसी बळाचा वापर करीत ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ड्रिलिंगचा सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाढवण व परिसरातील स्थानिकांनी आक्रमक होत ‘सरकार हमसे डरती है, पोलिस को आगे करती है’ अशी घोषणाबाजी करत सर्व्हे रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याने पोलिस व ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक तसेच बाचाबाचीचा प्रकार घडला. यावेळी आयटीडी कंपनीच्या एका अधिकाऱ्याला धक्काबुक्कीही करण्यात आली.
गेल्या अनेक दिवसांपासून वाढवण बंदराच्या रस्त्यासाठी जमीन मोजणीबरोबरच इतर कामे सुरू आहेत. रस्ता मोजणीला ग्रामस्थांचा विरोध आहे. असे असतानाही सर्व्हे करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली.
ग्रामस्थांचे रौद्ररूप पाहून कंपनीने गाड्या वळवल्या
डायमेकर, शेतकरी, मच्छीमारांनी एकत्र येत सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी तणाव निर्माण झाल्याने पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, सुप्रीम कोर्टाने वाढवण बंदराच्या स्थळावर ड्रिलिंग, बांधकाम आदी कामे करण्यास स्थगिती दिली असताना काम का सुरू केले जाते, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने पोलिस आणि ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. समुद्रकिनारपट्टीवर ड्रिलिंगसाठी आणि बांधकामासाठी आयटीडी कंपनीने आणलेल्या काही गाड्या ग्रामस्थांचे रौद्ररूप पाहून पोलिसांनी मागे घेतल्या. दरम्यान, आयटीडी सिमेंटेशन इंडिया लिमिटेडचे अधिकारी मोठ्या पोलिस फौजफाट्यासह वरोर गावाच्या हद्दीत समुद्रात ड्रिलिंग सर्व्हे करण्यासाठी आले होते.
ड्रिलिंग सर्व्हेला सशर्त मंजुरी
दरम्यान, वाढवण बंदर संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील, उपाध्यक्ष वैभव वझे, ज्योती मेहेर, विनीत पाटील, हेमंत तामोरे, रामकृष्ण तांडेल, नंदकुमार विंदे, निखिल पाटील, तसेच पोलिस अधीक्षक देशमुख यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान वाढवण बंदराच्या ड्रिलिंग सर्व्हेव्यतिरिक्त कोणतेही काम करू नये, अशी सशर्त मंजुरी देण्यात आली.
भरउन्हात बंदोबस्त; महिला पोलिस बेशुद्ध
वाढवण बंदराच्या ड्रिलिंग सर्व्हेसाठी आज सकाळपासून वरोर येथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भरउन्हात बंदोबस्त सुरू असल्याने एक महिला पोलिस रेणुका राबड यांना चक्कर येऊन बेशुद्ध झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात पाठविण्यात आले.