लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा: उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना १०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याने एका विद्यार्थीनीची प्रकृती बिघडून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना वसईतील एका शाळेत घडली. मृत मुलगी इयत्ता सहावीत शिकत होती. शाळा व्यवस्थापन व शिक्षकांच्या हलगर्जीमुळे मुलीचा जीव गेल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
८ नोव्हेंबर रोजी सकाळी अनेक विद्यार्थी उशिरा आले म्हणून शिक्षकांनी त्यांना १०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. काही विद्यार्थ्यांनी दप्तर खांद्यावर घेऊनच उठाबशा काढल्या. शाळेतून घरी परतल्यानंतर मुलीची तब्येत बिघडली. तिला घरच्यांनी सुरुवातीला वसईतील रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती बिघडल्याने तिला जेजे रुग्णालयात हलविण्यात आले. येथे उपचारादरम्यान शुक्रवारी बालदिनाच्या रात्री तिचा मृत्यू झाला. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुलीच्या पालकांनी केली आहे. पोलिसांनी शाळेत व रुग्णालयात जाऊन याप्रकरणी अधिक चौकशी केली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर शाळेला भेट दिली. मात्र, शनिवार असल्याने कोणीही भेटले नाही. शाळेतील दोन शिक्षिका भेटल्या. मात्र, कोणतेही रेकॉर्ड बघायला मिळाले नाही तसेच कुठलीही माहिती मिळाली नाही. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करून अहवाल सादर केला जाईल.- पांडुरंग गलांगे, गटशिक्षणाधिकारी, वसई
मुंबईहून अकस्मात मृत्यूचा गुन्हा वालीव पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. प्रथमदर्शनी मुलीचा मृत्यू उठाबशा काढल्याने झाल्याचे दिसून येते. डॉक्टरांची कागदपत्रे आणि तक्रार आल्यावर पुढील प्रक्रिया व चौकशी केली जाईल.- दिलीप घुगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वालीव पोलिस ठाणे
शाळेत विद्यार्थ्यांना अशी छोटी-मोठी शिक्षा दिली जाते. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना उशिरा आल्यामुळे शिक्षा केली. पण, कोणी किती उठाबशा केल्या हे माहीत नाही. दोन-तीन दिवसाने त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती केले होते. तिचा कशामुळे मृत्यू झाला हे अहवाल आल्यावर कळेल.- प्रशांत काकडे, शिक्षक
Web Summary : In Vasai, a student died after being punished with 100 sit-ups for being late. The sixth-grader's family alleges negligence. An investigation is underway, focusing on school practices and medical reports to determine the cause of death.
Web Summary : वसई में, स्कूल में देर से आने पर 100 उठक-बैठक की सजा के बाद एक छात्रा की मौत हो गई। परिवार ने लापरवाही का आरोप लगाया है। मौत के कारणों की जांच के लिए स्कूल की प्रथाओं और मेडिकल रिपोर्ट पर ध्यान केंद्रित किया जा रहा है।