अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी : चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी झाल्याचा कांगावा केला जातो, मात्र त्यांच्या संवर्धनाकरिता प्रयत्न करणारे विरळाच असतात. दरम्यान, डहाणूतील वडकून येथल्या चिमणीपाड्यावर चिमणी संवर्धनाचा वसा घेतलेल्या शोभा माच्छी यांचा लळा चिमण्यांना लागला असून ४० ते ५० चिमण्या त्यांच्या अंगणात दाणे टिपायला येतात.डहाणू नगर परिषद क्षेत्रातील वडकून हा भाग फुग्यांची फॅक्टरी, चमच्यांचा बफिंग व्यवसाय आणि कोळंबी प्रकल्पाकरिता प्रसिद्ध आहे. येथे चिमणीपाड्यावर माच्छी समाजातील लोकांची संख्या अधिक आहे. या पाड्यावरील लोकांची विचारसरणी पक्षी संवर्धनाची असल्याने पक्ष्यांची शिकार केली जात नाही. दरम्यान, व्यवसायाने अंगणवाडी सेविका असलेल्या शोभा गणपत माच्छी यांना वृक्षारोपण आणि बागकामाची आवड आहे. त्यातून पक्षी निरीक्षणाची आवड त्यांच्यात निर्माण झाली आहे. कधी-कधी काम करताना त्या चारोळ्या करतात, तर कधी कविता गुणगुणतात.अंगणवाडीत काम करताना छोट्या बालकांना गाणी-गोष्टी शिकवताना चिऊ-काऊंचा संदर्भ येतो. त्यामुळे आपल्याही अंगणात, परसबागेत, दिवाणखान्यात चिमण्यांनी येऊन किलबिलाट करावा असं त्यांना वाटलं. मग त्यांनी अंगणात चिमण्यांना दाणे टाकण्यास सुरुवात केली. काही दिवस एक-दिवस हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकी त्यांची संख्या होती. काही महिन्यांनी त्यामध्ये भर पडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग त्यांनी अंगणात दाण्यांसह पाणी ठेवायला प्रारंभ केला. अंगणवाडीतून आल्यानंतर घरची दैनंदिन कामे केल्यानंतर त्या रोज दुपारी नियमाने दाणे टाकतात. कामात व्यस्त असल्यावर घरी यायला उशीर होतो, मात्र चारच्या ठोक्यावर ४० ते ५० चिमण्या घरालगतच्या झाडांवर येऊन चिवचिवाट करतात. मी दाणे घेऊन बाहेर आल्यावर ते टिपायला त्या अंगणात येतात. ते खाऊन झाल्यावर बाजूला ठेवलेल्या भांड्यातून पाणी पिता-पिता जलक्रीडेचा आनंदही लुटतात, असे शोभा मॅडम म्हणतात.चिमण्यांची संख्या घटत असल्याची ओरड होते. दाणे-पाणी टाकून चिमणी संवर्धनाचा ध्यास घेतला, त्यातून माझ्या अंगणी अनेक चिमण्या नेमाने अंगणात येतात. त्या माझ्या सख्या बनल्यावर आणि त्यांना दाणे टाकणे हा छंद. त्यांच्या भेटीतून विरंगुळा आणि जीवन आनंदाने जगण्याची प्रेरणा मिळते.- शोभा गणपत माच्छी,रहिवासी वडकून, चिमणीपाडा
आज जागतिक चिमणी दिन : चिमणीपाड्यावर चिमण्यांचा होतो चिवचिवाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 01:36 IST