सासुरवाडीला आलेल्या जावयावर चाकूने वार, बुलढाण्यातील तरुणाचा पालघरमध्ये खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 07:52 IST2025-01-03T07:52:42+5:302025-01-03T07:52:58+5:30

या प्रकरणी पालघर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

Son-in-law stabbed youth from Buldhana murdered in Palghar | सासुरवाडीला आलेल्या जावयावर चाकूने वार, बुलढाण्यातील तरुणाचा पालघरमध्ये खून

सासुरवाडीला आलेल्या जावयावर चाकूने वार, बुलढाण्यातील तरुणाचा पालघरमध्ये खून

पालघर : येथे सासुरवाडीला आलेल्या महादेव दौलत घुगे (३०, रा. बुलढाणा) या विवाहित तरुणावर बोईसर येथील दोन तरुणांनी हुतात्मा चौक परिसरात चाकूचे वार करून हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. सिल्वासा येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा गुरुवारी (दि. २) मृत्यू झाला. या प्रकरणी पालघरपोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील महादेव घुगे याचा दोन महिन्यांपूर्वी पालघरमधील खानपाडा परिसरातील एका तरुणीशी विवाह झाला होता. विवाहानंतर पत्नीची तब्येत बरी नसल्याने ती माहेरी पालघर येथे आली होती. तिला नेण्यासाठी महादेव पालघरला आला होता. बुधवारी रात्री तो एका गुत्त्यावर दारू पिण्यासाठी बसल्यानंतर त्याची बोईसर येथे राहणाऱ्या साहिल राजू वाघारी (२३) याच्याशी ओळख झाली. त्यानंतर हे दोघेही फिरत हुतात्मा स्तंभ परिसरात आले. आरोपी साहिलला त्याचा मित्र अनिस इद्रिस खान (२५) भेटला. तेव्हा तिघांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी महादेववर चाकूने वार करून पळून गेले. जखमी अवस्थेत महादेव यांनी पालघर पोलिस ठाणे गाठून पोलिसांना घडलेली हकिकत सांगितली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जवळच असलेल्या साहिल वाघारी याला ताब्यात घेतले; मात्र दुसरा आरोपी अनिस खान हा पळून गेला होता. त्याला बोईसरच्या गदापाडा परिसरातून अटक करण्यात आली. 

उपचारादरम्यान मृत्यू
-  गंभीर जखमी असलेल्या महादेव घुगे याला प्रथम उपचारासाठी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला अत्यवस्थ अवस्थेत पुढील उपचारासाठी सिल्वासा येथील रुग्णालयात नेण्यात आले; मात्र, गुरुवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 
-  या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात प्रथम जिवे मारण्याचा प्रयत्न या गुन्ह्याची नोंद केल्याचे पालघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनंत पराड यांनी सांगितले.

Web Title: Son-in-law stabbed youth from Buldhana murdered in Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.