मीरा भाईंदरचे पहिले आमदार दिवंगत गिलबर्ट मेंडोन्सा यांचा मुलगा आणि नातू काँग्रेस मध्ये; पक्ष प्रवेशासाठी कुटुंबीय होते उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 20:39 IST2025-12-19T20:39:12+5:302025-12-19T20:39:31+5:30
विशेष म्हणजे तारेन ह्याला शुभेच्छा देण्यासाठी या प्रवेश सोहळ्यात मोठ्या संख्येने मेंडोन्सा कुटुंबीय उपस्थित होते...

मीरा भाईंदरचे पहिले आमदार दिवंगत गिलबर्ट मेंडोन्सा यांचा मुलगा आणि नातू काँग्रेस मध्ये; पक्ष प्रवेशासाठी कुटुंबीय होते उपस्थित
मीरारोड - मीरा भाईंदर शहराच्या राजकारणावर एकेकाळी आपले एकहाती वर्चस्व ठेवणारे शहराचे पहिले नगराध्यक्ष व पहिले आमदार दिवंगत गिलबर्ट मेंडोन्सायांचा मुलगा वेंचर व नातू तारेन यांनी गुरुवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थिती मध्ये भाईंदर येथील सभेत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तारेन यांच्या रूपाने गिलबर्ट मेंडोन्सा यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. विशेष म्हणजे तारेन ह्याला शुभेच्छा देण्यासाठी या प्रवेश सोहळ्यात मोठ्या संख्येने मेंडोन्सा कुटुंबीय उपस्थित होते.
मीरा भाईंदर मध्ये गिलबर्ट मेंडोन्सा यांना मानणारा मोठा वर्ग आहे. राजकारण व समाजकारणात मेंडोन्सा यांचा प्रभाव मोठा राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची पालिकेत सत्ता आणण्यात मेंडोन्सा यांची मोठी भूमिका होती. त्यांच्या निधना नंतर मेंडोन्सा यांच्या कुटुंबातील सदस्य काँग्रेस पक्षात असा अशी इच्छा काँग्रेसनेते मुझफ्फर हुसेन यांनी व्यक्त केली होती. मेंडोन्सा यांचा नातू तारेन वेंचर मेंडोन्सा यांना काँग्रेस पक्षात प्रवेशा बाबत मुझफ्फर यांच्या सोबत चर्चा झाली होती. तारेन ह्याचे वडील वेंचर हे माजी नगरसेवक आहेत. त्या दोघांचा पक्ष प्रवेश भाईंदर पश्चिम येथील काँग्रेसच्या सभेत झाला.
यावेळी तारेन ह्याला राजकीय भवितव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याची आई, माजी उपमहापौर राहिलेले आजोबा स्टीव्हन मेंडोन्सा, माजी नगरसेविका असलेल्या आजी ग्रीटा फेरो व आत्या असेनला मेंडोन्सा सह नीला मेंडोन्सा, अवीता मेंडोन्सा आदींसह अनेक नातलग आवर्जून उपस्थित होते. असेनला यांनी आपल्या भाषणात जसे वडील गिलबर्ट मेंडोन्सा यांना सर्वानी प्रेम दिले तसेच प्रेम त्यांच्या नातवाला द्या अशी भावना व्यक्त केली.