लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर: समुद्रात निर्माण झालेल्या वादळात सापडून मुंबई, गुजरातमधील जाफराबाद, उना येथील सहा बोटी (ट्रॉलर्स) सोमवारी बुडाल्या. ११ खलाशांना वाचवण्यात आले आहे. मात्र, अजूनही सात खलाशी बेपत्ता आहेत. तटरक्षक दलाची हेलिकॉप्टरद्वारे सुरू असलेली शोधमोहीम वादळी वारे आणि मुसळधार पावसाच्या अडथळ्यामुळे थांबविण्यात आल्याचे भावनगर येथील मच्छिमारांनी ‘लोकमत’ला सांगितले.
सोमवारी समुद्रात वादळी वारे आणि तुफानी लाटांमुळे गुजरातमधील जाफराबादच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या जय आणि मुरलीधर या दोन ट्रॉलर्स बुडाल्या.
५० ट्राॅलर्स समुद्रात
भावनगर (नवा बंदर) येथील समुद्रात आजही वादळ असल्याने गुजरात राज्यातील १२ ट्रॉलर्स डहाणू गावच्या समोर समुद्रात सुरक्षितस्थळी उभ्या केल्याची माहिती मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त दिनेश पाटील यांनी दिली. अजून ५० ट्रॉलर्स समुद्रात असल्याने त्यांच्या कुटुंबीयांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मोरा बंदरात गुजरातचा मच्छीमार बेपत्ता
मोरा बंदरात आश्रयासाठी आलेल्या गुजरातच्या मच्छीमार बोटीतील एक खलाशी बेपत्ता झाला आहे. भरत डालकी (४४), असे त्याचे नाव आहे.