धक्कादायक! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची कार गुजरातच्या तलावातून बाहेर काढली; घातपात झाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 19:06 IST2025-01-31T19:02:20+5:302025-01-31T19:06:49+5:30
डहाणू येथील शिवसेना शिंदे गटाचे संघटक अशोक धोडी गेल्या १२ दिवसापासून बेपत्ता आहेत.

धक्कादायक! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची कार गुजरातच्या तलावातून बाहेर काढली; घातपात झाला?
डहाणू येथील शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा संघटक अशोक धोडी गेल्या १२ दिवसापासून बेपत्ता आहेत. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास काही दिवसापासून सुरू केला होता. या प्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. गुजरात येथील भिलाड जवळ त्यांची कार एका तलावात सापडली आहे. या कारमध्ये मृतदेह असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मिळालेली माहिती अशी, गेल्या काही दिवसापासून पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला होता. धोड यांची कार गुजरात येथील सरिग्राम येथील मालाफलिया येथील एका बंद असलेल्या दगड खाणीजवळ असलेल्या तलावात सापडली. पोलिसांनी ही कार बाहेर काढली आहे. ही कार अशोक धोडी यांचीच असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, पालघर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.
जॅकेट आणि हेडफोन सापडले
गेल्या काही दिवसापासून पालघरचे पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील हे स्वत: या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी ही कार तलावातून बाहेर काढण्यापूर्वी त्यांना एक काळ्या रंगाचे जॅकेट आणि पांढऱ्या रंगाचे हेडफोन मिळाले आहेत.
गुजरातमधील हे ठिकाण निर्जनस्थळी आहे. बंद असलेली दगडाची ही खाण आहे. या खाणीजवळ एक तलाव आहे. या तलावामध्येच अशोक धोडी यांची कार सापडली आहे. तलावाकाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान, आता कार बाहेर काढण्यात आली आहे.
अंधाराचा फायदा घेत आरोपी झाला पसार
गेल्या ८ दिवसांपासून बेपत्ता असलेले शिंदेसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणाचं गौडबंगाल कायम आहे. या प्रकरणी पालघर पोलिसांनी अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश धोडी आणि अन्य चौघांना ताब्यात घेतले होते. मात्र चौकशीसाठी पोलिसांकडे आलेला संशयित आरोपी अविनाश धोडी अंधाराचा फायदा पोलीस ठाण्यातूनच घेत पसार झाला आहे. घोलवड पोलीस ठाण्यातील अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. यात संशयित अविनाश धोडीला चौकशीसाठी बोलावलं होते. मात्र तो फरार झाला.
२० जानेवारीपासून बेपत्ता
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी असलेले अशोक धोडी हे हॉटेल व्यावसायिकही आहेत. २० जानेवारीपासून अशोक धोडी बेपत्ता आहेत. याबाबत अशोक धोडी यांच्या पत्नीने घोलवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या तक्रारीत त्यांनी दीरावर संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश धोडी आणि त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत. त्यात अविनाश धोडीला ताब्यात घेतले होते. मात्र अंधाराचा फायदा घेत अविनाश पोलीस ठाण्यातूनच पसार झाल्याचं समोर आले.