वरळी सी लिंक ते गेट वे ऑफ इंडियाचे अंतर पोहून पूर्ण, शार्दुलचा विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 22:20 IST2021-02-18T22:20:14+5:302021-02-18T22:20:38+5:30
शार्दूल घरतने मुंबईत 36 कि.मी सागरी अंतर 8 तास 4 मिनिटांत शार्दूल ने पोहून पूर्ण केले.

वरळी सी लिंक ते गेट वे ऑफ इंडियाचे अंतर पोहून पूर्ण, शार्दुलचा विक्रम
आशिष राणे
वसईच्या पश्चिम किनारपट्टी भागातील कळंब या निसर्गरम्य गावचा 21 वर्षीय सुपूत्र तथा उत्कृष्ट जलतरणपटू शार्दूल विद्याधर घरत आजवरच्या अनेक पोहण्याच्या स्पर्धेत विजेता म्हणून नावारूपाला आलेला असून त्याने आता पुन्हा मुंबईत 36 कि.मी हे सागरी अंतर पोहून जाण्याचा नवीन विक्रम नोंदवला आहे. दरम्यान दि.17 फेब्रुवारी ला मुंबईत एडव्हेंचर सी स्विमिंग एक्सपिडिशन ,मुंबई -2021 यांनी पोहण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते त्यात वसईतील शार्दूल ही सहभागी झाला होता,
बुधवार दि.17 फेब्रुवारी रोजी सकाळी आयोजित केलेल्या या पोहण्याच्या स्पर्धेत त्याने वरळी सी लिंक ते गेट वे ऑफ़ इंडिया हे 36 कि.मी सागरी अंतर 8 तास 4 मिनिटांत पोहून पूर्ण केले. त्याच्या या नव्या स्पर्धेने अजून एक नवा विक्रम नोंदवला गेला आहे. सदर जलतरण मोहीम ही पहाटे 3 -50 वाजता वरळी सी लिंक येथून सुरू झाली व सकाळी 11.54 वा. गेटवे ऑफ़ इंडिया येथे पूर्ण झाली. विशेष म्हणजे जलतरण पटू शार्दुलने यापूर्वी दि.5 जानेवारी -2021 रोजी वसई तालुक्यात शिवसेनेने आयोजित केलेल्या अर्नाळा किल्ला ते वसई किल्ला हे 22 किलोमीटर अंतर ही पार केले होते; तर तो ही विक्रम मोडून त्याने आज स्वतःच्या नावे 36 किलोमीटर पोहण्याचा नवीन विक्रम स्थापित केला आहे.
अर्थातच वसईतील अवघा 21 वर्षीय तरुण आणि तो ही मेहनती समाज म्हणून ओळखला जाणारा दर्याचा राजा (मांगेला ) कोळी समाजाचे भूषण असल्याचे सिद्ध केलं आहे.यासोबतच त्याच्या या यशाने वसई तालुक्यातून व पंचक्रोशीतील वर्गातून शार्दुलचे मनस्वी अभिनंदन होत आहे. नक्कीच शार्दूल हा कला -क्रीडा स्पर्धेत आपले प्राविण्य दाखवण्यासाठी भावी तरुण मुले व मुली त्याच्यासाठी उदाहरण असल्याची बोलकी प्रतिक्रिया कला क्रीडा प्रेमींनी बोलून दाखवली.