ज्वेलर्समध्ये दरोडा; ३ कोटींचे दागिने; २० लाखांची रोकड दरोडेखोरांनी पळवली, नेपाळी गँगच्या शोधासाठी पाेलिसांची पाच पथके
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 06:09 IST2025-11-11T06:08:19+5:302025-11-11T06:09:18+5:30
Palghar Robbery News: रेल्वे स्थानकासमोर असलेल्या अशोका अंबर शॉपिंग कॉम्प्लेक्समधील नाकोडा ज्वेलर्स दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून तिजोरीतील ३ कोटी ७२ लाख ३५ हजार ४६० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने, २० लाखांची रोकड पळवल्याची घटना शनिवारी घडली होती.

ज्वेलर्समध्ये दरोडा; ३ कोटींचे दागिने; २० लाखांची रोकड दरोडेखोरांनी पळवली, नेपाळी गँगच्या शोधासाठी पाेलिसांची पाच पथके
- हितेन नाईक
पालघर - रेल्वे स्थानकासमोर असलेल्या अशोका अंबर शॉपिंग कॉम्प्लेक्समधील नाकोडा ज्वेलर्स दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून तिजोरीतील ३ कोटी ७२ लाख ३५ हजार ४६० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने, २० लाखांची रोकड पळवल्याची घटना शनिवारी घडली होती. यामध्ये सुरक्षारक्षक असलेले दीपक सिंग आणि नरेश यांनी संगनमत करून साथीदारांच्या साहाय्याने ही घरफोडी केल्याचे प्राथमिक तपासा निष्पन्न झाले आहे. या आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह पोलिसांची पाच पथक नेमण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिली.
पालघर रेल्वे स्थानकाच्या समोरील मॉलमध्ये ६० ते ७० दुकाने आहेत. या दुकानांच्या रखवालीसाठी दीपक सिंग आणि नरेश (पूर्ण नाव माहीत नाही) हे नेपाळी सुरक्षारक्षक ६ महिन्यांपासून कार्यरत आहेत. या माहितीच्या आधारे व तांत्रिक माहितीचा मागाेवा घेत तपास सुरू केल्याचे पाेलिसांनी सांगितले.
दुकानाला भगदाड
८ नोव्हेंबर रोजी नाकोडा ज्वेलर्सचे मालक फिर्यादी पीयूष दिनेश जैन (२५ वर्षे) यांनी ८:३० वाजता आपले दुकान बंद करून ते घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी ज्वेलर्सच्या दुकानाशेजारी असलेले दुकानदार अशोक राजपुरोहित हे आपले दुकान उघडण्यासाठी आले असताना ज्वेलर्सच्या दुकानाच्या शेजारी असलेले कपड्याच्या दुकानाचे शटर तुटलेले दिसले. कपड्याच्या दुकानातील भिंतीला भगदाड पाडून आरोपी ज्वेलर्स दुकानात शिरले.
दरोडेखोरांनी गॅस कटरने कापली तिजोरी
दरोडेखोरांनी तिजोरी गॅस कटरने कापून त्यात ठेवलेले ९२ सोन्याच्या चैन, ३१ नेकलेस २७१ अंगठ्या, ३५९ कानातील टॉप्स आणि झुमके, ९२ मंगळसूत्राला लावण्यात येणारे पेंडल, आठ ब्रेसलेट ११८ मंगळसूत्राच्या वाटी १२ नग सोन्याचे कॉइन ४० किलो वजनाचे चांदीचे दागिने, २० लाख रुपये रोख असे एकूण ३ कोटी ७२ लाख ३५ हजार ४६० रुपयांचा ऐवज चोरून चोरटे पसार झाले आहेत.
चाेर सीसीटीव्हीत कैद
सीसीटीव्हीमध्ये ५ ते ६ चोरटे ही घरफोडीसाठी आल्याचे चित्रीकरण पोलिसांच्या हाती सापडले असून, त्यांच्या शोधासाठी पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकाऱ्यांच्या टीमसह अन्य चार टीम या चोरांच्या मागावर वेगवेगळ्या भागात पाठविल्याचे सांगितले. लवकरच आम्ही या प्रकरणाचा तपास करून चोरांना समोर उभे करू, असा विश्वास त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.