सरकारी रुग्णालयाच्या आयसीयूत उंदराने हात कुरतडला, वृद्धेचा मृत्यू; भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 12:53 IST2026-03-17T12:53:06+5:302026-03-17T12:53:40+5:30

सोमवारी सकाळी त्यांचा मुलगा भेटण्यासाठी गेला असता हा प्रकार समोर आला. यावेळी उंदीर त्यांना पाहताच पळून गेला.  मीरारोड मधील प्लेझंट पार्क भागात राहणाऱ्या सुहासिनी माठेकर (८९) यांना १२ मार्च रोजी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात  दाखल केले होते.

Rat gnaws hand in ICU of government hospital, elderly dies Incident at Pandit Bhimsen Joshi Hospital in Bhayandar | सरकारी रुग्णालयाच्या आयसीयूत उंदराने हात कुरतडला, वृद्धेचा मृत्यू; भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील घटना

सरकारी रुग्णालयाच्या आयसीयूत उंदराने हात कुरतडला, वृद्धेचा मृत्यू; भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील घटना

मीरारोड : अतिदक्षता विभागात उपचार सुरू असलेल्या ८९ वर्षीय वृद्ध महिलेचा हात उंदराने कुरतडल्याची धक्कादायक घटना भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी या सरकारी रुग्णालयात सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर सायंकाळी या वृद्धेचा मृत्यू झाला. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही. दरम्यान, या घटनेमुळे सरकारी रुग्णालयातील अस्वच्छता, उंदरांचा सुळसुळाट यांमुळे येथील कारभाराची लक्तरे मात्र वेशीवर टांगली गेली आहेत.

 सोमवारी सकाळी त्यांचा मुलगा भेटण्यासाठी गेला असता हा प्रकार समोर आला. यावेळी उंदीर त्यांना पाहताच पळून गेला.  मीरारोड मधील प्लेझंट पार्क भागात राहणाऱ्या सुहासिनी माठेकर (८९) यांना १२ मार्च रोजी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात  दाखल केले होते. सोमवारी पहाटे सुहासिनी यांचा मुलगा आईला भेटण्यास अतिदक्षता विभागात गेला असता त्यांनी उंदीर पळून जाताना पाहिला. तर चादर रक्ताने माखलेली दिसली. पळून जाताना उंदरांचे रक्ताने माखलेले पायही बेडशीटवर दिसत होते. हात उंदराने कुरतडल्याने जखम होऊन सूज आली होती. 

चौकशी समिती नेमली; दोषींवर कठोर कारवाई करणार
आयसीयूसारख्या विभागात उंदरांचा मुक्त संचार होत असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. रात्री कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर वा परिचारिकांच्या हा प्रकार लक्षात कसा आला नाही, याबाबतही संताप व्यक्त होत आहे.

याप्रकरणी उद्धवसेनेच्या जिल्हा संघटक नीलम ढवण व उपजिल्हाप्रमुख सुभाष केसरकर, शहराध्यक्ष प्रशांत सावंत, क्षमा गांधींसह मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे, सचिन पोपळे व पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनास जाब विचारत ठिय्या मांडला व संबंधितांवर कारवाईची मागणी केली.

याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून याप्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे व त्यासाठी चौकशी समिती नेमल्याचे अधीक्षक डॉ. जाफर तडवी यांनी सांगितले. 

रुग्णालयातील सुविधा व्हेंटिलेटरवर असल्याचे उघड
भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात मागील काही महिन्यांपासून बऱ्यापैकी सुधारणा झाल्याचा दावा वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधी करत आहेत. 
याशिवाय येथे उपचार घेणाऱ्या 
रुग्णांची संख्याही वाढली आहे. मात्र, या घटनेमुळे आणि सुविधा व स्वच्छतेच्या अभावामुळे पंडित भीमसेन जोशी रुग्णालय हे स्वतः व्हेंटिलेटर असल्याचेच समोर आले आहे.

Web Title : आईसीयू में चूहे ने काटा, बुजुर्ग महिला की मौत

Web Summary : भाईंदर के सरकारी अस्पताल के आईसीयू में चूहे द्वारा काटे जाने से 89 वर्षीय महिला की मौत हो गई। जांच शुरू, कार्रवाई का आश्वासन दिया गया है। अस्पताल प्रशासन सवालों के घेरे में।

Web Title : Rat bites elderly woman in ICU, leading to death.

Web Summary : In Bhayandar, an 89-year-old woman died after a rat bit her in the ICU of a government hospital. The family discovered the incident. Investigation started; action assured.