मराठी उद्घोषणेच्या मुद्द्यावर रेल्वे स्टेशन मास्तरची मुजोरी; तरुणाला डांबून ठेवायला सांगितले, आरपीएफ अधिकाऱ्यांनी मात्र नकार दिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:17 IST2026-01-02T13:16:34+5:302026-01-02T13:17:01+5:30
मॅन्युअली उद्घोषणा मराठी भाषेतून न दिल्यास भाईंदर येथील जिगर पाटील हे स्टेशन मास्तर कार्यालयात जाऊन तक्रार करतात. ३० डिसेंबरला भाईंदर स्थानकात मराठीतून उद्घोषणा झाली नव्हती.

मराठी उद्घोषणेच्या मुद्द्यावर रेल्वे स्टेशन मास्तरची मुजोरी; तरुणाला डांबून ठेवायला सांगितले, आरपीएफ अधिकाऱ्यांनी मात्र नकार दिला
मीरा रोड : रेल्वेस्थानकावर उद्घोषणा करताना मराठी भाषेचा वापर होत नसल्याची नेहमी तक्रारी करतो म्हणून एका मराठी तरुणास जेलमध्ये टाकण्यास भाईंदरच्या रेल्वे स्टेशन मास्तरने आरपीएफला बजावले. मात्र आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी तक्रार नोंदविण्यासाठी आलेल्या या तरुणास जेलमध्ये टाकता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली. या घटनेने ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मराठी भाषेचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.
मॅन्युअली उद्घोषणा मराठी भाषेतून न दिल्यास भाईंदर येथील जिगर पाटील हे स्टेशन मास्तर कार्यालयात जाऊन तक्रार करतात. ३० डिसेंबरला भाईंदर स्थानकात मराठीतून उद्घोषणा झाली नव्हती. त्यामुळे ते या स्थानकातील स्टेशन मास्तर कार्यालयात जाऊन विपिन सिंह या स्टेशन मास्तरांकडे मराठीत उद्घोषणा झाली नसल्याची तक्रार करत तक्रार वही मागितली होती. दरम्यान, या बाबत सिंह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
मराठी एकीकरण समितीने विचारला जाब
स्टेशन मास्तरने मराठी तरुणाशी केलेल्या कथित मुजोरीनंतर मराठी एकीकरण समितीचे प्रमोद पार्टे, प्रवीण भोसले, नाना खुणे, महेश पवार आदी रेल्वेस्थानकात पोहोचले. त्यांनीदेखील स्टेशन मास्टर विपिन सिंह यांना कारवाईचा जाब विचारत निषेध व्यक्त केला.
विनातिकीट प्रवास केला म्हणून दंड आकारला
आरपीएफचे अधिकारी हे जिगर याला घेऊन त्यांच्या पोलिस ठाण्यात गेले असता तेथे त्यांनी विचारणा केल्यावर जिगर मराठी उद्घोषणेबाबतचा प्रकार सांगितला. आरपीएफ अधिकाऱ्यांनी जिगरला पुन्हा स्टेशन मास्तरकडे नेले. आरपीएक कारवाई करत नाही म्हणून तिकीट नसल्याच्या कारवाईसाठी सिंह यांनी रेल्वेस्थानकातून ‘टीसी’ला बोलावले. विनातिकीट म्हणून जिगरकडून दंड आकारला.