आदिवासी महिलांचा डोक्यावरून पाणी वाहून नेण्याचा प्रश्न सुटला! रोटरी क्लबचा पालघर जिल्ह्यात अभिनव उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 13:27 IST2021-12-09T13:27:10+5:302021-12-09T13:27:33+5:30
Palghar News: दुर्गम आदिवासीबाहुल्य पालघर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रांची परिस्थिती अशी आहे की कुपोषण, उपासमार, पिण्याच्या पाण्याची टंचाई, पुरेशा औषधोपचारांचा अभाव अशा अनेक समस्यांना याठिकाणातली लोकं वर्षानुवर्षे तोंड देत आहेत.

आदिवासी महिलांचा डोक्यावरून पाणी वाहून नेण्याचा प्रश्न सुटला! रोटरी क्लबचा पालघर जिल्ह्यात अभिनव उपक्रम
ठाणे - मायानगरी म्हणून नावाजलेल्या व देशाची आर्थिक-व्यावसायिक राजधानी असलेल्या मुंबईत ज्याठिकाणी एकीकडे भव्य ऐश्वर्याचे आणि लक्ष्मीजींच्या असीम कृपेचे दिव्य दर्शन घडते, त्याचठिकाणी दुसरीकडे याच मुंबईशी अगदी जुडलेल्या दुर्गम आदिवासीबाहुल्य पालघर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रांची परिस्थिती अशी आहे की कुपोषण, उपासमार, पिण्याच्या पाण्याची टंचाई, पुरेशा औषधोपचारांचा अभाव अशा अनेक समस्यांना याठिकाणातली लोकं वर्षानुवर्षे तोंड देत आहेत. रोटरी या आंतरराष्ट्रीय पातळीवर जनसेवेत कार्यरत असलेल्या संस्थेने या भागातील आदिवासींच्या समस्या सोडविण्याच्या दिशेने पुढाकार घेतला, ज्यामध्ये वॉटरव्हीलचे वाटप सर्वात लक्षणीय होते.
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ आणि अखिल भारतीय अग्रवाल संमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या दोन दिवसीय कार्यक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, सफाळे, मोखाडा, जांभूळपाडा, मारवान, पोळ गाव आदी ठिकाणांसह मनोर येथील आस्था हॉस्पीटल येथे जयपूर फूट, वॉटरव्हील प्रोजेक्ट, फळ-वृक्षारोपण, एकल विद्यालय पाहणी दौरा, सॅनिटरी पॅड वाटप, अन्नधान्य वाटप व मेगा मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. मेगा वैद्यकीय शिबिरांतर्गत नाक-कान-घसा, हृदयविकार, यकृत विकार, अस्थिव्यंग, जनरल फिजिशियन, दंतरोग, स्त्रीरोग, मोतीबिंदू तपासणी व ऑपरेशन आदींचा समावेश होता. अंबरीश दफ्तरी, राकेश मिश्रा, रोटेरियन व अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाच्या राष्ट्रीय चिटणीस सौ. सुमन आर अग्रवाल, पालघर रोटरी क्लबचे अध्यक्ष दिपेश ठाकूर, शिल्पा गोयल, भाविन, किरीट संघवी, भगवान पाटील, श्रीगोपाल पचीसिया आदींनी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ चे गव्हर्नर डॉ. राजेंद्र अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अत्यंत लोकोन्मुख कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य प्रदान केले. सदर कार्यक्रमास विविध तज्ञ डॉक्टर आणि आरोग्य कर्मचा-यांच्या पथकाचेही बहुमोल सहकार्य लाभले. मेगा मेडिकल कॅम्पचे ९१६ लाभार्थ्यांनी फायदा घेतला, तर २०० सॅनिटरी पॅडचे किट आणि ३१५ वॉटरव्हीलचे याप्रसंगी वाटप करण्यात आले. विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांची उपस्थिती या सोहळ्याला गौरवपूर्ण होती.
रोटरी क्लब ऑफ मुंबई एसेसच्या सुमन अग्रवाल यांनी या वेळी सांगितले की, या दुर्गम भागात वॉटरव्हील वाटप केल्याने आदिवासी महिला व मुलींचा अनेक किलोमीटर दूरवरून पाणी वाहून नेणाऱ्या प्रश्न सुटला आहे. या महिला-मुलींचा २५ टक्के वेळ पाणी वाहून नेण्यात वाया जातो, आरोग्याच्या समस्यांबरोबरच यामुळे सदर क्षेत्रातील मुलींचे शिक्षणचा महत्वपूर्ण वेळही वाया जातो ते वेगळेच. वॉटरव्हीलच्या माध्यमातून त्यांना आता डोक्यावर किंवा खांद्यावर न नेता ४५ लिटर पाणी एकाच वेळी आणण्याची सुविधा मिळालेली आहे. सदर कार्यक्रमास यशस्वी करण्याकरिता रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ च्या विविध क्लबांचा सिंहाचा वाटा होता.