विद्यार्थिनी मृत्यूप्रकरणी मुख्याध्यापक, शिक्षकांवर ठपका; शिक्षणाधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल सादर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 09:49 IST2025-07-17T09:48:43+5:302025-07-17T09:49:05+5:30

अहवालात मुख्याध्यापक व शिक्षकांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवला आहे, तसेच संस्थाचालकांना संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.

Principal, teachers blamed for student's death; Education officer's inquiry report submitted | विद्यार्थिनी मृत्यूप्रकरणी मुख्याध्यापक, शिक्षकांवर ठपका; शिक्षणाधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल सादर 

विद्यार्थिनी मृत्यूप्रकरणी मुख्याध्यापक, शिक्षकांवर ठपका; शिक्षणाधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल सादर 

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाडा : तालुक्यातील सोनाळे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा २६ जूनला मृत्यू झाला होता. याप्रकरणी चौकशी करून पालघर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी अहवालात मुख्याध्यापक व शिक्षकांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवला आहे, तसेच संस्थाचालकांना संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.

तालुक्यातील बिलघर येथील प्रकाश झाटे यांच्या प्रियांका (वय १३) व वेदिका (११) या दोन मुली असून, न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अनुक्रमे सातवी आणि पाचवीत शिक्षण घेत होत्या. त्यांचे वर्ग रोज सकाळी १०:५० ते सायंकाळी ४:५० या वेळेत भरते. १६ जूनला सकाळी दोन्ही मुली घरून पायी चालत शाळेत गेल्या. सायंकाळी ४:१५ वाजेच्या सुमारास न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक मोतीराम नडगे हे वेदिका हिला कारमधून घरी घेऊन आले. त्यावेळी वेदिका पूर्णपणे बेशुद्ध होती. याबाबत नडगे यांना विचारले असता, त्यांनी दुपारी ३:३० वाजता मधल्या सुटीत वेदिका चक्कर येऊन बेशुद्ध झाल्याने तिला घरी घेऊन आल्याचे सांगितले. तेव्हा मुलीच्या पालकांनी शाळेच्या जवळच दवाखाना आहे, तुम्ही मुलीला दवाखान्यात का नेले नाही, अशी विचारणा करताच ते काहीही न बोलता निघून गेले. त्यानंतर बेशुद्धावस्थेतच वेदिकेला मोटारसायकलवरून वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात ४:४५ वाजता नेले असता तेथील डाॅक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.

विद्यार्थी सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी शाळेची
वेदिकावर वेळेत उपचार केले असते, तर मुलीचे प्राण वाचले असते. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी त्यास उशीर केल्यामुळेच मुलीचा जीव गेल्याचा आरोप करत प्रकाश झाटे यांनी मुलीच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी चौकशीचे आदेश दिले होते.

शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी केलेल्या चौकशीनंतर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला असून, यात मुख्याध्यापक व शिक्षकांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवला आहे. घटना शालेय वेळेत घडल्याने विद्यार्थी सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी शाळेची आहे, असे अहवालात म्हटले आहे.

Web Title: Principal, teachers blamed for student's death; Education officer's inquiry report submitted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा