बांधावरील तूर लागवड शेतकऱ्यांसाठी ठरते वरदान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 12:24 AM2020-03-01T00:24:02+5:302020-03-01T00:24:09+5:30

शेतकऱ्यांकडून भात हे मुख्य पीक घेतले जात असले तरी या वर्षीच्या खरीप हंगामात येथील शेतक-यांकडून तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे.

Plantation of turkey is a boon for the farmers | बांधावरील तूर लागवड शेतकऱ्यांसाठी ठरते वरदान

बांधावरील तूर लागवड शेतकऱ्यांसाठी ठरते वरदान

googlenewsNext

राहुल वाडेकर 
विक्रमगड : तालुक्यात शेतकऱ्यांकडून भात हे मुख्य पीक घेतले जात असले तरी या वर्षीच्या खरीप हंगामात येथील शेतक-यांकडून तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. दरवर्षी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात आंतरपीक म्हणून तुरीचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. तुरीतील पोषक घटकांमुळे थोड्या प्रमाणात कुपोषणावरही मात करण्यास मदत होत असते.
विक्रमगड तालुक्यात पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने भातशेती केली जाते. त्यातून येणारे उत्पन्न अत्यंत मर्यादित स्वरूपात असते. काही शेतकरी अत्याधुनिक पद्धतीने शेती करत असले तरी केवळ भातशेतीवर अवलंबून राहणे त्यांनाही आता कठीण होऊन बसले आहे. त्यात भातशेतीमधे उत्पादन खर्च जास्त तर पैसे कमी मिळतात. त्यामुळे काही शेतकरी बांधावरील तूर लागवड करत आहेत. गेल्या पाच-सहा वर्षापासून शेतक-यांना तूर, कडू वाल, हरभरा, उडीद लागवडीसाठी काही सामाजिक संस्था व शासनाच्या कृषी विभागाकडून प्रोत्साहन देऊन त्यांना उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचा फायदा येथील शेतक-यांना होताना दिसू लागला आहे. यामुळे शेतक-यांना तुरीचा लाभ घेण्याबरोबरच अतिरिक्त तुरीची विक्री करून त्यातून आर्थिक फायदा मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
>कुपोषणावर ठरू शकते पर्याय
गेल्या दोन-तीन वर्षात तूर डाळीचे भाव सुमारे अडीचशे ते तीनशे रुपयांपेक्षाही जास्त झाले होते. आजही ही भाववाढ कायम आहे आणि नजीकच्या येणाºयाही काळात वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या महागाईच्या काळात शेतक-यांना घरच्या घरी तूर डाळीचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. तूर डाळीतील पोषक घटकांमुळे या डाळीला मोठी मागणी असून त्यामुळे कुपोषणावर मात करणे शक्य ठरेल असे काहींचे म्हणणे आहे. तालुक्यात आदिवासी शेतकºयांना खरीप, रब्बी हंगामात तूर, हरभरा, कडू वाल, उडीद याच्या बियाण्याचे मोफत वाटप करून ही पिके घेण्यास प्रोत्साहन दिल्यास भात पिकाला उत्तम पर्याय ठरून मोठ्या प्रमाणात पोषक घटक असलेल्या डाळी शेतक-यांना घरच्या घरी उपलब्ध होतील व अधिकचे तूर, हरभरा, वाल, उडीदचे उत्पन्न विकून रोजगारही मिळेल. त्यामुळे अनेक वर्ष गाजत असलेल्या कुपोषण कमी करण्यास थोड्या फार प्रमाणात मदत होऊ शकते, असे जाणकार शेतक-यांचे मत आहे.
>आंतरपीक म्हणून ठरते फायद्याचे
तूर लागवडीसाठी मोठी विस्तृत जागा लागत नाही. शेताच्या बांधावर, माळरानावर या पिकाची लागवड करून भात शेती करणारे शेतकरी तुरीचे आंतर पीक घेऊ शकतात. हे पीक ओसाड माळरान, बांधावर, खाचरावर घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात जागेची बचत होते. त्याचप्रमाणे या पिकावर जास्त प्रमाणात किड-रोग येत नाहीत. खताची जास्त आवश्यकता नसते. आंतरपीक म्हणून याची लागवड केल्यामुळे भात पिकाच्या बांधावर वाढणारी तण, गवत यांच्यावर नियंत्रण येऊन किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव रोखला जातो. त्यामुळे भाताचे पिकाचे उत्पन्न बरोबर दुबार पीक घेण्यास मदत होते व शेतक-यांना अधिकचा आर्थिक फायदा होतो.

Web Title: Plantation of turkey is a boon for the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.