व्यवसायातून कर्जाचा डोंगर चढल्याने आई-वडिलांनी संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 20:22 IST2026-03-18T20:21:58+5:302026-03-18T20:22:09+5:30
Palghar Crime News: सफाळे जवळील उसरणी गावात राहणाऱ्या पती पत्नीने आपल्यावर चढलेल्या बँकेच्या कर्जाच्या बोझा सहन न झाल्याने एकाच साडीचे दोन तुकडे करीत फासावर लटकत स्वतःचे जीवन संपवले.

व्यवसायातून कर्जाचा डोंगर चढल्याने आई-वडिलांनी संपवलं जीवन
- हितेन नाईक
पालघर - सफाळे जवळील उसरणी गावात राहणाऱ्या पती पत्नीने आपल्यावर चढलेल्या बँकेच्या कर्जाच्या बोझा सहन न झाल्याने एकाच साडीचे दोन तुकडे करीत फासावर लटकत स्वतःचे जीवन संपवले.मंगळवारी रात्री ही घटना नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर केळवे सागरी पोलिसांच्या मदतीने दरवाजा तोडून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
केळवे सागरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या उसरणी ह्या गावी कैलास दत्तात्रेय किणी (वय 47) आणि कोमल कैलास किणी (वय 38) असे मृत पती-पत्नी आपल्या किमया ह्या १९ वर्षीय मुलीच्या सोबत राहत होते. कैलास ह्याने आपल्या मुलीने उच्च शिक्षण घ्यावे ह्यासाठी तिला कसलीही कमी पडू दिले नाही.दुसरीकडे गावात स्वतःचे किराणा सामानाचे दुकान चालवित ते आपला उदरनिर्वाह चालवित होते.कैलास ह्याला उच्च मधुमेहाचा त्रास होता. परंतु सफाळे येथे त्याने टाकलेल्या ताडी पट्ट्याच्या दुकानासाठी घेतलेल्या बँकेतील कर्जाचा डोंगर ही त्याच्या डोक्यावर वाढतहोता. बँक आणि देणेकरी कर्ज रक्कमेच्या मागणीचा तगादा लावीत असल्याने दोघेही पती पत्नी नैराश्येत जगत होते. मंगळवारी ठाणे येथे परीक्षेसाठी गेलेल्या किमया हिने आपले वडील मोबाईल फोन उचलत नसल्याचे आपल्या काकूला फोन करून सांगितले.तिने त्यांच्या घरी जाऊन पाहिले असता घराचे सर्व दरवाजे आतून बंद केल्याने त्यांनी आपल्या पतीच्या कानावर ही घटना सांगितले. ह्या प्रकरणाचा फिर्यादी भाऊ संदीप किणी हे सफाळे येथे आपल्या दुकानात असल्याने त्यांनी तात्काळ आपल्या भाऊचे घर गाठले.
सर्व दरवाजे बंद असल्याचे पाहिल्यावर त्यांनी सागरी पोलीस ठाण्याला माहिती दिली त्यांनी तात्काळ घर गाठून दरवाजा उघडला असता कोमल किनी हिने आपल्या साडीचे दोन तुकडे करून एका तुकड्याने स्वतः घराच्या हॉलमध्ये गळफास घेतला तर तिचा पती कैलास याने दुसऱ्या साडीच्या तुकड्याने आपल्या बेडरूम मध्ये गळफास घेतल्याचे दिसून आले. आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने लाखो रुपयांचे कर्जबाजारी झालेल्या पती पत्नीने आत्महत्या केल्याने त्यांची मुलगी किमया हिला प्रचंड धक्का बसला असून माझ्या उच्च शिक्षणातून चांगली नोकरी मिळवून तुम्हाला दोघांना ह्या कर्जाच्या विळख्यातून नक्कीच बाहेर काढले असते असा विश्वास तिच्या भावनेतून व्यक्त होत आहे. या प्रकरणी केळवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.