डांबरयुक्त तवंगाने मासेमारी व्यवसायावर परिणाम, किनारा काळवंडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 00:14 IST2019-08-13T00:04:46+5:302019-08-13T00:14:08+5:30
किनारी भागात काळपट रंगाचा डांबराचा तवंग पसरल्याने किनारा विद्रुपीकरणासह मासेमारीवर त्याचा परिणाम होतो आहे.

डांबरयुक्त तवंगाने मासेमारी व्यवसायावर परिणाम, किनारा काळवंडला
- अनिरु द्ध पाटील
डहाणू/बोर्डी - तालुक्यातील किनारी भागात काळपट रंगाचा डांबराचा तवंग पसरल्याने किनारा विद्रुपीकरणासह मासेमारीवर त्याचा परिणाम होतो आहे. दरम्यान, वाढत्या समुद्री प्रदूषणाचा मच्छिमार, व्यवसायिक आणि ग्राहक या साखळीला फटका बसत आहे तर पर्यटन व्यवसायावरही त्याचा परिणाम जाणवत आहे.
१ जून ते ३१ जुलै ही शासकीय मासेमारी बंदी नुकतीच उठली आहे. शिवाय आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस आणि जोराच्या वाऱ्यामुळे मच्छीमारी नौका समुद्रात गेल्या नाहीत. तर किनाºयालगत पारंपरिक मासेमारीला प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र लाटांसह काळपट रंगाचा डांबराचा तवंग किनारा आणि काही नॉटिकल क्षेत्रात पसरल्याने मासेमारी जाळी प्रभावित होऊन मासे गावण्याची संख्या घटल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. तर त्वचेला या तवंगाचा स्पर्श होऊन दुष्परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पूर्वीही या काळात हा तवंग पाण्यावर पसरायचा मात्र त्याचे प्रमाण कमी होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणामुळे त्यात वाढ झाली असून माशांची संख्याही घटल्याने किनाºयालगत मासेमारी करणाऱ्यांना त्याच्या झळा बसत आहेत. तर काहीवेळा माशांना तेलकट वास येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे मच्छीमार, मासे विक्री करणारे व्यावसायिक आणि खवय्ये या साखळीवर त्याचा परिणाम होत आहे. यामुळे औद्योगिक कारखान्यातील फिल्टर न केलेले रसायनयुक्त पाणी, प्लास्टिक पॉलिथिनचा कचरा समुद्रात टाकण्याविरुद्ध नियमांची कठोर अंमलबजावणीची आवश्यकता आहे. तर पाण्यातील दूषित घटकांचे प्रमाण कमी करून समुद्री पर्यावरणाला पोषक वातावरण निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाºया कांदळवनाचे क्षेत्र किनारी भागात वाढविणे अत्यावश्यक आहे.
काळपट तवंग मासेमारी साहित्य आणि मच्छिमारांच्या शरीराला लागल्याने नुकसान होते. किनारा विद्रुपीकरणामुळे पर्यटक चौपाट्यांकडे पाठ फिरवत असून व्यवसायावर परिणाम होतो. पाण्यातील रसायनयुक्त प्रमाण वाढत राहिल्यास समुद्री पर्यावरण धोक्यात येण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त होत आहे.
औद्योगिकरणामुळे समुद्र प्रदूषित झाल्याने हे थांबले पाहिजे. जीवसृष्टीला वाचवण्यासाठी तत्काळ पाऊल उचलणे गरजेचे आहे.
- अॅड. गिरीश राऊत, पर्यावरणतज्ज्ञ