ना अपघाताची भीती ना दंडाची; दुचाकी चालविताना मोबाइलवर बोलणारे वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 01:15 AM2021-01-03T01:15:03+5:302021-01-03T01:15:10+5:30

वर्षभरात ३८४९ वाहनचालकांवर कारवाई : ६ लाख ६७ हजारांचा दंड वसूल

Neither fear of accident nor punishment; Mobile speakers increased while riding a bike | ना अपघाताची भीती ना दंडाची; दुचाकी चालविताना मोबाइलवर बोलणारे वाढले

ना अपघाताची भीती ना दंडाची; दुचाकी चालविताना मोबाइलवर बोलणारे वाढले

googlenewsNext



सुनील घरत 
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारोळ : मोबाइल ही आज जीवनावश्यक बाब बनली असून ज्याच्याकडे मोबाइल नाही असा माणूस मिळणे दुर्मीळ बनले आहे. दुसरीकडे आज दुचाकी चालवताना मोबाइलवर बोलणे ही एक फॅशन झाली आहे. या जीवघेण्या फॅशनचे अनुकरण दुचाकी चालवताना अनेक जण करत आहेत. ना त्यांना अपघाताची भीती, ना दंडाची, ना कुटुंबाची, अनेकदा ट्रक चालवणारेसुद्धा एका हातात मोबाइल व एका हाताने वाहन चालवतात. त्यामुळे नाहक निरपराध नागरिकांचा बळी जाण्याचा धोकाही वाढला आहे.
दरम्यान, वर्षभरात गाडी चालवताना मोबाइलवर बोलणाऱ्यांवर वाहतूक विभागाने मोठी कारवाई  केली असून त्यांच्याकडून दंडही वसूल केला आहे.
   वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे हे धोक्याचे असते. यामुळे अपघात होऊन चालकाचा मृत्यू झाल्याच्या घटना वाढत आहेत. वसई, विरार, नालासोपारा परिसरात अनेक वाहनचालकांना वाहन चालविताना मोबाइलवर बोलताना वाहतूक पोलिसांनी पकडले. त्यात ३ हजार ८४९ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.  वाहन चालविताना मोबाइलवर बोलल्यास अपघात होण्याची शक्यता असते. हे वाहनचालकांना माहिती असतानाही वाहनचालक वाहने चालवताना हा नियम मोडतात. मोबाइल आजघडीला अत्यावश्यक वस्तू बनली असली तरी काही ठिकाणी मोबाइलचा वापर करणे टाळावे. परंतु जीवाची पर्वा न करता मोबाइलवर सतत लागून राहणे हे अनेकांच्या जीवावर बेतले आहे. यामुळे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जानेवारी ते डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. 

वाहनचालकांची बेफिकिरी
वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या ३ हजार ८४९ वाहनचालकांना पकडून त्यांच्याकडून ७ लाख ६७ हजारांचा दंड वसूल केला गेला आहे. मोबाइलवर बोलत असताना वाहन चालवू नये किंवा वाहन चालवताना कुणाचा फोन आला तरीही तो फोन उचलू नये, असे वाहतूक नियम आहेत. मात्र वाहनचालक नियम मोडून आपल्याच धुंदीत वाहन चालवतात. 

प्रवास करीत असताना मोबाइलवर बोलताना आढळल्यास संबंधित वाहनचालकांकडून प्रत्येकी २०० रुपये दंड घेतला जात आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईसाठी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येते. वाहन चालवताना मोबाइलवर बोलण्यास बंदी असल्याने अशा वाहनचालकांवर कारवाई करून दंड वसूल केला जातो. ही कारवाई सतत सुरूच असते.
- विलास सुपे, 
वाहतूक पोलीस अधिकारी

Web Title: Neither fear of accident nor punishment; Mobile speakers increased while riding a bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.