कासटवाडी ते कशिवली घाट बनलाय अपघातांचा रस्ता, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 00:33 IST2019-08-12T00:33:17+5:302019-08-12T00:33:42+5:30
- हुसेन मेमन जव्हार : शहरापासून अगदी ९ कि.मी. अंतरावर असलेला कासटवाडी ते कशिवली हा घाट सध्या अपघातांनाच रस्ता ...

कासटवाडी ते कशिवली घाट बनलाय अपघातांचा रस्ता, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष
- हुसेन मेमन
जव्हार : शहरापासून अगदी ९ कि.मी. अंतरावर असलेला कासटवाडी ते कशिवली हा घाट सध्या अपघातांनाच रस्ता झाल्याचे दिसते आहे. गेल्या आणि यंदाच्या पावसाळ्यात येथे २६ हून अधिक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातात एकाचा मृत्यू तर ७० हून अधिक वाहन चालक आणि दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. येथे सर्वाधिक अपघात दुचाकीस्वारांचे झाल्याचे समोर आले आहे. मात्र, याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
कासटवाडी रस्ता ते कशिवली घाट येथे पावसाळ्यात जास्त अपघात घडतात. कासटवाडी गावाजवळील ३ किमी.चा रस्ता हा निसरडा झाल्याने पावसाळ्यात चालकांनी ब्रेक मारले तरीही वाहनाचा टायर सरकून अपघात घडल्याचे येथील नागरिक आणि काही चालकांनी सांगितले.
जव्हार - कासटवाडी - कशिवली हा मुंबई ठाणे, कल्याण, डहाणू, पालघरकडे जाणारा मुख्य रस्ता आहे. दोन वर्षापूर्वी हा रस्ता जव्हारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. मात्र राष्ट्रीय महामार्ग या रस्त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही. बांधकाम विभाग सांगते हा रस्ता महामार्गाकडे गेला आहे. तर राष्ट्रीय महामार्ग सांगते, अजूनही हा रस्ता आमच्याकडे आलेला नाही. तो बांधकाम विभागाकडेच आहे. त्यामुळे येथील जनतेने न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे.
कासटवाडी गावाजवळील रस्त्यावर गेल्यावर्षी देखील पावसाळ्यात अपघातांचे छत्र सुरू होते. मात्र त्यानंतर नागरिकांच्या तक्रारी आणि प्रसिद्धी माध्यामांनी हा रस्त्याचा मुद्दा उचलून धरल्यानंतर राष्ट्रीय महामार्गाने यात लक्ष घालते. ३ किमी.च्या या रस्त्यावर पाच ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले.
मात्र तरीही हे अपघातांचे सत्र सुरूच आहे. येथील नागरिकांना याबाबत माहिती असल्याने ते सावकाशपणे गाडी चालवतात. मात्र, नव्याने येणाऱ्यांना येथून खूप सांभाळून जावे लागते. या वाहनचालकांना याची माहिती नसल्याने हे अपघात घडत आहेत.
कासटवाडी ते कशिवली घाट हा नागमोडी वळणाचा असून, घाटात रस्त्यावरील संरक्षक भिंती तुटल्याने हा रस्ता खचत चालला आहे. असे असतानाही या घाटातील संरक्षक भिंती बांधण्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
२५ ते ३० वर्षांपूर्वी या रस्त्यावर काही ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्यात आल्या तर काही ठिकाणी दगड रचून दगडी बांध म्हणजेच संरक्षण कठडा बांधण्यात आला होता. मात्र, आजमितीस या संरक्षक भिंती आणि दगडी बांध तुटले असून हा घाट अत्यंत धोकादायक बनला आहे.
जव्हारहून मुंबई - ठाणे - कल्याण - पालघरकडे म्हणजेच जिल्ह्याला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावरून रोजच शेकडो वाहने ये - जा करतात. रोजच जाणाºया वाहनचालकांना यामुळे काही फरक पडत नाही. हा अरुंद रस्ता, त्यातच नागमोडी वळणे, तुटलेले संरक्षण कठडे त्यामुळे रात्रीच्या वेळी येथून जाताना मोठी कसरत करावी लागते.
त्यातच जव्हार हे पर्यटनस्थळ असल्याने या घाटातील रस्त्यावरून पावसाळ्यात रोजच शेकडो पर्यटक येतात. मात्र घाटात रस्ता तुटल्यामुळे पर्यटकांना, नवीन वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
हा रस्ता आमच्या विभागाकडे हँडओव्हर झालेला नाही. याची दुरूस्ती करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. - निलेश महाजन,
उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग
हा रस्ता आमच्या विभागाकडे येत नाही. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे हँडओव्हर झाला आहे.
- डी.जी. होले,
उपअभियंता सा.बां. विभाग, जव्हार.
जव्हार ते कासटवाडी, कशिवली घाट हा मुंबई, ठाणे अशा महत्त्वाच्या शहरांना जोडणारा रस्ता आहे. हा रस्ता दुरूस्त करण्याच्या मुद्द्यावरून बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. त्यांच्या निष्काळजीपणामुळे नाहक इतरांचे बळी जात आहेत. यामुळे कोणीतरी जबाबदारी स्वीकारून रस्त्याची तात्काळ दुरु स्ती करावी.
- सुनील भुसारा , राष्ट्रवादी काँग्रेस पालघर जिल्हाध्यक्ष.