५ जणांची हत्या; आरोपी २३ वर्षांनंतर झाला जेरबंद; बंगळुरूतून अटक, नालासोपारा पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 14:27 IST2025-03-22T14:26:43+5:302025-03-22T14:27:44+5:30
आरोपीला २७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

५ जणांची हत्या; आरोपी २३ वर्षांनंतर झाला जेरबंद; बंगळुरूतून अटक, नालासोपारा पोलिसांची कारवाई
नालासोपारा : मित्रासह सावत्र आई व तीन सावत्र अल्पवयीन भावंडांचा निर्घृणपणे खून करणाऱ्या आरोपीला २३ वर्षांनंतर बंगळुरू येथून अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. अक्षय शुक्ला असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला २७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
आरोपी राजू उर्फ अक्षय शुक्ला आणि त्याचा मित्र मनोज साह (२५) हे दोघे वालीवच्या नाईक पाड्यातील शिव भीमनगर येथे राहात होते. सामाईक भिंतीच्या वादाचा मनात राग धरून २६ मार्च २००८ रोजी कल्पतरू इंडस्ट्रीयल इस्टेटमधील युटिलिटी प्रिंटर्स कंपनीच्या पोटमाळ्यावर राजूने मनोजचे डोके भिंतीवर आपटून ठार मारले होते. २७ मार्च २००८ रोजी माणिकपूर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. हत्या केल्यापासून आरोपी तुर्भे, वालीव, सुरत, बंगळुरू येथे सुरक्षारक्षक, प्लम्बिंग, मेकॅनिक म्हणून काम करत होता.
निवडणूक ओळखपत्रामुळे पकडण्यात यश
आरोपीने २००२ साली सावत्र आई गीताकुमारी शुक्ला, सावत्र बहिणी पुजाकुमारी (७), प्रियंका कुमारी (६) आणि सावत्र भाऊ मान (२) या चौघांचा गळा आवळून खून केला होता.
आरोपीच्या वडिलांनी आरोपी मुलाविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. निवडणूक ओळखपत्रामुळे आरोपीला पकडले.
गुन्हे शाखेच्या युनिट दोनची कामगिरी
पोलिस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहा. पोलिस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनचे पो. निरीक्षक समीर अहिरराव, स. पो. नि. सोपान पाटील पोलिस उपनिरीक्षक अजित गीते, सहा. फौजदार रमेश भोसले तसेच त्यांच्या टीमने ही कामगिरी केली.