खून करुन फरार झालेल्या आरोपीला जहाजातून अटक; २०० पेक्षा अधिक जहाजांची तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 16:32 IST2025-10-04T16:30:34+5:302025-10-04T16:32:06+5:30
नायगावच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी

खून करुन फरार झालेल्या आरोपीला जहाजातून अटक; २०० पेक्षा अधिक जहाजांची तपासणी
मंगेश कराळे
नालासोपारा : खुन करुन फरार झालेल्या आरोपीला गुजरात राज्यातील द्वारका बंदर येथील जहाजातून अटक करण्यात नायगावच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी शनिवारी दिली आहे.
नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसई पूर्वेकडील कामण येथील सेनरजी हायजील कंपनी येथे काम करणारे कामगार दिलीप सरोज (मयत) व सुनिल प्रजापती (आरोपी) यांना कंपनीचे मालक प्रकाश धुंकर चामरिया यांनी ७ सप्टेंबरला दोघांच्या जेवणाच्या खर्चासाठी एकत्रित रक्कम आरोपी सुनिल प्रजापती याच्या बैंक खात्यात दिले होते. परंतु आरोपी सुनिल याने नमुदची रक्कम यातील मयत दिलीप सरोज यांस दिली नाही. सदर कारणावरुन त्यांच्या दोघांमध्ये वाद होवून सुनीलने दिलीपला कोणत्या तरी साधनाने डोक्याच्या उजव्या व मागील बाजूला, दोन्ही डोळ्यांवर व उजव्या हाताला गंभीर दुखापत केली होती. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्यातील जखमी दिलीप याच्यावर उपचार सुरू असताना उपचारादरम्यान मृत्यू झाला. नायगांव पोलिसांनी आरोपीवर हत्येची कलमे लावून गुन्ह्यात वाढ केली होती.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे दोन वेगवेगळे पथके बनवुन आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपासा दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी हा ओका, व्दारका बंदर, गुजरात येथील जहाजात लपून राहत असल्याचे निष्पन्न झाले. ओका बंदरालगत असणान्या सुमारे २०० पेक्षा जास्त जहाजांची तपासणी करुन आरोपी सुनील प्रजापती (३५) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केल्यावर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्यावर अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोनि अभिजीत मडके हे करीत आहेत.
वरील कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलिस उपायुक्त पौणिमा चौगुले, सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ घोगरे, नायगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अभिजीत मडके यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश केकान, पोउपनिरी ज्ञानेश्वर आसबे, अनिल मोरे, सफौ बाबाजी चव्हाण, पोहवा शेखर पवार, सचिन ओलेकर, सचिन मोहीते, सचिन खंताळ, जयवंत खंडवी, अमर पवार, चेतन ठाकरे, अशोक पाटील, पांडुरंग महाले, बाळासाहेब भालेराव आणि अमोल बरडे यांनी पार पाडली आहे.