आई, मुलाला बंधक बनवून चाकूच्या धाकाने दिवसाढवळ्या लुटले; वसईच्या सातिवली येथील रिलायबल ग्लोरी इमारतीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 19:34 IST2025-11-18T19:34:13+5:302025-11-18T19:34:50+5:30
मंगेश कराळे लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : वसई पुर्वेकडील सातिवली विभागातील रिलायबल ग्लोरी या इमारतीतील एका घरात दुपारच्या दीड वाजण्याच्या ...

आई, मुलाला बंधक बनवून चाकूच्या धाकाने दिवसाढवळ्या लुटले; वसईच्या सातिवली येथील रिलायबल ग्लोरी इमारतीतील घटना
मंगेश कराळे
लोकमत न्यूज नेटवर्क,
नालासोपारा : वसई पुर्वेकडील सातिवली विभागातील रिलायबल ग्लोरी या इमारतीतील एका घरात दुपारच्या दीड वाजण्याच्या सुमारास आलेल्या तीन आरोपींनी आई व मुलाला चाकूच्या धाकाने चिकटपट्टीने तोंड, हात पाय बांधून लुटल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दिवसाढवळ्या घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर वालीव पोलिसांच्यावर कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सातिवली येथील रिलायबल ग्लोरी इमारतीच्या ए विंग मधील ३०१ सदनिकेत संजिता राऊत नावाची महिला परिवारासह राहतात. या इमारतीत राहणारे राजेश सिंग यांनी दिलेली माहितीनुसार मंगळवारी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास १८ ते ३० वयोगटातील आरोपी हातात चाकू घेऊन त्यांच्या घराची बेल वाजवली. त्यांनी दरवाजा उघडताच चाकूच्या धाकाने घरात घुसले. संजिता आणि त्यांच्या मुलाच्या तोंडाला, हातापायाला चिकटपट्टी लावून बंधक बनवले. त्यानंतर आरोपींनी घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा ऐवज लुटून पळून गेले. आरोपी पळाल्यावर घरातील लोकांनी खिडकीत येऊन आरडाओरड केल्यावर इमारतीमधील लोक जमा झाले. त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती वालीव पोलिसांना दिल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी हेच आरोपी इमारतीत आल्याची माहिती येथील राहणाऱ्या रहिवाशांनी दिली आहे. तेच आरोपी असतील अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. सदर महिलेच्या गळ्याला चाकू लागल्याने जखमी झाली असून तिच्याकडून विरोध केला असल्याचे कळते.
दुपारच्या सुमारास तीन आरोपींनी चाकूच्या धाकाने घरात घुसून चिकटपट्टीने बांधून कपाटाची चावी घेऊन मुद्देमाल चोरून नेला आहे. आरोपींना पकडण्यासाठी तीन ते चार टीम तयार केल्या आहेत. गुन्हे शाखेच्या टीमही आरोपींच्या मागावर आहे. लवकरच आरोपी पकडून गुन्ह्याची उकल करणार.
- पौर्णिमा चौगुले - श्रींगी, (पोलिस उपायुक्त)