मीरा भाईंदरच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई! जप्त केलेल्या रसायनातून तयार झाले असते १२ हजार कोटींचे एमडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 13:50 IST2025-09-06T12:30:40+5:302025-09-06T13:50:08+5:30
११ कोटींच्या एमडी सह काही हजार कोटींचे एमडी बनवण्या इतके साहित्य जप्त

मीरा भाईंदरच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई! जप्त केलेल्या रसायनातून तयार झाले असते १२ हजार कोटींचे एमडी
वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा कक्ष ४ ने तेलंगणातील मेफेड्रोन अमली पदार्थ बनवणारा कारखाना उघडकीस आणत एमडी बनवण्याच्या रसायनांचा मोठा साठा जप्त केला आहे. त्या साहित्यातून तयार होणाऱ्या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय किंमत सुमारे १२ हजार कोटी रुपयांच्या घरात असती अशी माहिती पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. कारखान्यातून ५ किलो ७९० ग्रॅम एमडी व अंमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या ३५ हजार ५०० लिटर रसायन, ९५० किलो पावडर व इतर साहीत्य जप्त केले आहे.
मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अमली पदार्थांची विक्री व नशा सार्वजनिक ठिकाणी देखील उघडपणे चालत असते. अमली पदार्थांच्या तस्करीत काही पोलीस कर्मचारी देखील सापडले व अटक झाले. अमली पदार्थांची कारवाई देखील दिखाव्या पुरती असायची. विक्रेत्यांच्या मागचे तस्कर, सूत्रधार आणि उत्पादकां पर्यंत पोलीस पोहचतच नव्हते. गुन्हे शाखा १ ने एमडी बनवणारा कारखाना शोधून कारवाई केल्याचे काही अपवाद होते.
मधुकर पांडेय यांच्या कार्यकाळात अमली पदार्थांची नशा, विक्री, तस्करी बेफाम झाल्याचे आरोप झाले. त्यानंतर आयुक्त पदी आलेल्या निकेत कौशिक यांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अमली पदार्थांच्या विक्री - तस्करीतील भ्रष्ट नशा उतरवा आणि आयुक्तालय नशा मुक्त करा असे निर्देश दिले होते. पोलीस आयुक्तांनी देखील आढावा घेऊन अनेक फेरबदल करत अमली पदार्थ विरोधी शाखेची दोन शाखा केल्या.
पोलीस आयुक्तांनी अमली पदार्थांची कारवाई वरवरची नको तर त्या मागचे रॅकेट शोधून उध्वस्त करा असे आदेश पोलिसांना दिले होते. गुन्हे शाखेचे उपायुक्त संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद बडाख सह सहायक निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, उपनिरीक्षक उमेश भागवत व पथकाने मीरारोड मध्ये ८ ऑगस्ट रोजी गुन्हे शाखेने काशिमीरा नाका जवळून पकडलेल्या बांग्लादेशी विक्रेती फातिमा मुराद शेख ( वय २३) रा. काजूपाडा, घोडबंदर मार्ग ह्या एमडी विक्रेत्या महिले कडून २१ लाखांचा मेफेड्रोन अमली पदार्थ जप्त केला होता. तिच्या कडून तपासाची पुढील एक एक कडी जोडत एकूण १० जणांना पोलिसांनी अटक केली होती.
एमडी बनवण्याचा कारखाना असल्याचा सुगावा लागताच एका अटक आरोपीला सोबत नेत तेलंगणा राज्यातील हैद्राबाद जवळच्या चेरापल्ली औद्योगिक वसाहतीतील नवदया कॉलनी भागातील एका कारखान्यावर सदर पोलीस पथकाने शुक्रवारी धाड टाकली. तेथे एमडी बनवले जात असल्याचे निष्पन्न झाल्याने मालक श्रीनिवास विजय वोलेटी हा त्याचा केमिकल तज्ञ साथीदार तानाजी पंढरीनाथ पटवारी या दोघांना अटक केली आहे.
५ किलो ७९० ग्रॅम वजनाचे एमडी अंमली पदार्थ तसेच अंमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या ३५ हजार ५०० लिटर रसायन, ९५० किलो पावडर व इतर साहीत्य सापडले आहे. या ठिकाणी एमडी बनवण्यासाठी लागणारी यंत्रे मोठ्या प्रमाणात आहेत. औद्योगिक वसाहत असल्याने या ठिकाणी नियमित सरकारी यंत्रणा तपासणी करत असतात. मात्र एमडी अमली पदार्थ बनवला जात असल्याचा मागमूस स्थानिक प्रशासनास नसल्या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
शनिवारी मीरारोड येथील पोलीस आयुक्तालयात आयुक्त निकेत कौशिक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सदर कारवाईची माहिती दिली. यावेळी अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, गुन्हे शाखेचे उपायुक्त संदीप डोईफोडे उपस्थित होते.