पोल्ट्री फार्मच्या आड सुरू असलेला एमडीचा कारखाना उद्ध्वस्त; दाऊद गँग सामील
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 08:31 IST2025-12-16T08:30:53+5:302025-12-16T08:31:41+5:30
मिरा भाईंदर-वसई विरार पोलिसांची राजस्थानात कारवाई

पोल्ट्री फार्मच्या आड सुरू असलेला एमडीचा कारखाना उद्ध्वस्त; दाऊद गँग सामील
मिरा रोड पोल्ट्री फार्मच्या आडून एमडी बनवणारा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. ही कारवाई मिरा भाईंदर-वसई विरार पोलिसांनी राजस्थानच्या झुनझुनू येथे केली. कारखान्यातून १०० कोटींचे एमडी व इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्या ११ पैकी ९ आरोपींवर गंभीर गुन्हे आहेत. यांपैकी काही जण दाऊद गैंगशी संबंधित आहेत. हत्या, दहशतवादी कृत्यासह अनेक गुन्ह्यांत त्यांचा सहभाग असल्याचे पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांनी सांगितले.
मिरा रोड भागात अमली पदार्थविरोधी कक्ष एकने ४ ऑक्टोबरला मेफेड्रॉन विक्रीप्रकरणी ६ जणांना अटक केली होती. त्यानंतर आणखी चार जणांच्या मुसक्या आवळल्या. त्यातून या कारखान्याचा छडा लागला. या गुन्ह्याचा तपास मिरा-भाईंदर अमली पदार्थविरोधी शाखा एकचे पो.नि. समीर शेख, उपनिरीक्षक निखिल चव्हाण यांच्यासह पवन पाटील, प्रदीप टक्के, सचिन घेरे, विनोद आवळे, महेश वेल्हे, प्रतीक गोडगे; तर वसई-विरार अमलीपदार्थ कक्ष-२चे उपनिरीक्षक अनिल पवार यांच्यासह संग्राम गायकवाड, सुधीर नरळे, राजकुमार गायकवाड व अजित मेड आणि सायबर पो. ठाण्याचे संतोष चव्हाण संयुक्तपणे करत होते.
झुनझुनूमध्ये पोलिसांनी ठोकला तळ
पोलिसांना राजस्थानच्या झुनझुनूमधून अमली पदार्थ विक्रीसाठी येत असल्याचा सुगावा लागला होता. पोलिसांचे एक पथक आठवडाभरापासून झुनझुनू येथे तळ ठोकून होते. १४ डिसेंबरला एमडी विकण्यासाठी आलेला आरोपी हाती लागल्याने या कारखान्याचा पर्दाफाश झाला.
१०० कोटींचा मुद्देमाल जप्त
झुनझुनू येथे आरोपी अनिल विजयपाल सिहाग याला अटक करून १० किलो एमडी, एमडीचे प्री-कर्सर रसायने, तसेच एमडी बनविण्याच्या साथनांसह १०० कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.