Vidhan Sabha 2019: बहुजन विकास आघाडी भाजपच्या वाटेवर?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 03:54 AM2019-09-23T03:54:45+5:302019-09-23T06:49:00+5:30

मुख्यमंत्र्यांची घेतली भेट; सहायता निधीसाठी पालिकेकडून २५ लाखांचा धनादेश

Maharashtra Vidhan Sabha 2019 BJP on the path of Bahujan Development Alliance? | Vidhan Sabha 2019: बहुजन विकास आघाडी भाजपच्या वाटेवर?

Vidhan Sabha 2019: बहुजन विकास आघाडी भाजपच्या वाटेवर?

Next

वसई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने बोईसरचा आमदार फोडल्याने आणि नालासोपाऱ्यात आक्रमकरीत्या प्रदीप शर्मा यांना रिंगणात उतरविल्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. बहुजन विकास आघाडीच भाजपमध्ये विलीन होत असल्याचे अंदाज बांधले जाऊ लागले. मात्र बविआच्या नेत्यांनी ही अफवा असल्याचे स्पष्टीकरण दिले.

शिवसेनेशी मधुर संबंध असलेल्या बहुजन विकास आघाडीने राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते वसंत डावखरे यांचा विरोध असूनही स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून झालेल्या निवडणुकीतही शिवसेनेला मदत केली होती. त्यामुळे डावखरेंचा पराभव करून शिवसेनेचे रवींद्र फाटक निवडून आले. मात्र पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीवेळी शिवसेना-बविआ परस्परांविरोधात लढले. नंतर लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने शिट्टी हे चिन्ह काढून घेत बविआची पुरती कोंडी केली. आताही बोईसरमधील बविआचे आमदार विलास तरे यांना शिवसेनेत स्वगृही आणण्यात आले. नालासोपारा मतदारसंघात हितेंद्र ठाकूर यांचा मुलगा क्षितिज याच्याविरोधात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना उतरवून बविआच्या राजकीय अस्तित्वाला नख लावण्याचा प्रयत्न केला.

वसई मतदारसंघात हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात त्यांचे विरोधक, श्रमजीवीचे नेते आणि सध्या राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेले विवेक पंडित यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवावे, अशी तयारी मध्यंतरी सुरू होती. पंडित हे पूर्वीचे शिवसेनेचे उपनेते आहेत. ख्रिस्ती मतांचे विभाजन होऊ नये म्हणून त्यांनी निवडणूक मात्र अपक्ष म्हणून लढवली होती.

त्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी तातडीने बविआचे आमदार, महापौर यांच्यासह अन्य नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे फोटो व्हायरल झाले आणि तो पक्ष भाजपमध्ये विलीन होत असल्याच्या चर्चेला तोंड फुटले. मात्र सांगली, सातारा, कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी वसई-विरार महापालिकेने गोळा केलेल्या २५ लाखांच्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी ही भेट झाल्याचे बविआच्या नेत्यांनी सांगितले. यावेळी महापौर प्रवीण शेट्टी, आमदार क्षितिज ठाकूर, उपमहापौर प्रकाश रॉड्रिक्स, पालिका आयुक्त बळीराम पवार, माजी महापौर नारायण मानकर आदी उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 BJP on the path of Bahujan Development Alliance?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.