Lockdown News: अखेर वसई-विरारमधील तळीरामांचा घसा ओला; खरेदीसाठी उडाली झुंबड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 02:30 IST2020-05-06T02:30:00+5:302020-05-06T02:30:10+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने दारूची दुकाने सुरू

Lockdown News: अखेर वसई-विरारमधील तळीरामांचा घसा ओला; खरेदीसाठी उडाली झुंबड
पारोळ : राज्य शासनाच्या आदेशानंतर दारूची दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. रविवारी शासनाने आदेश पारित केल्यानंतर सोमवारी लगेचच तळीराम दारू घेण्यासाठी झुंडीने घराबाहेर पडले. महिनाभराचा श्रावण सुटावा आणि नंतर मांसाहारावर मनसोक्त ताव मारावा तसा तळीरामांनी मंगळवारी बीअर आणि वाइनशॉप दुकानांबाहेर गर्दी केली. दारू मिळेल की नाही, अशा विवंचनेत तळीरामांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचेही सौजन्य दाखवले नाही.
सोमवारी आॅरेंज आणि ग्रीन झोनमधील दारूच्या दुकानांना परवानगी मिळाली असली तरी रेड झोनमधील दारूची दुकाने सुरू करण्यासंदर्भातील आदेश पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी न दिल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने पालघर जिल्ह्यातील दारूची दुकाने सुरू झाली नाहीत. मात्र, जिल्हाधिकाºयांनी दारूची दुकाने सुरू करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिल्यानंतर जिल्ह्यातील दारूची दुकाने मंगळवारी सुरू करण्यात आली. सोमवारी दारूच्या दुकानाबाहेर दारू मिळेल या आशेने गर्दी केलेल्या तळीरामांचा घसा कोरडाच राहिला होता. मात्र, मंगळवारी दारूची दुकाने सुरू झाल्याने तळीरामांचा घसा ओला झाला. दारूसाठी मद्यपींना तासन्तास रांगेत उभे राहावे लागले.
एक दिवस उशिराने दारू मिळाल्यानंतरही मद्यपींच्या चेहºयावर आनंद दिसत होता. दरम्यान, मद्यपींना त्यांची मनपसंद दारू न मिळाल्यामुळे टाळेबंदीत मद्यविक्रेत्यांनी चढ्या किमतीने दारू विकल्याचा संशय व्यक्त होत असून त्यांची चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात येत आहे. मंगळवारी सकाळपासूनच तळीरामांनी वाइनशॉपसमोर लांबलचक रांगा लावल्या होत्या. दुकाने सुरू होताच झुंबड उडाली.
कुडूसमध्ये दारूच्या दुकानात प्रचंड गर्दी
वाडा : वाडा शहरात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने संपूर्ण शहर ७ मेपर्यंत बंद केले आहे. त्यामुळे तालुक्यात केवळ कुडूस येथील दारूचे दुकान उघडल्याने मंगळवारी येथे दारू घेण्यासाठी तळीरामांनी एकच गर्दी केली. यामुळे सोशल डिस्टन्सिंग धाब्यावर बसवल्याचे दिसून आले. दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी सोमवारी गर्दी केलेल्या तळीरामांची निराशा झाली. मंगळवारी मात्र, ही दुकाने उघडण्यात आली. वाडा शहरात अलीकडेच कोरोनाचा रुग्ण आढळल्याने तीन कि.मी.पर्यंतचा परिसर प्रशासनाने सील केला. त्यामुळे येथील सर्व दुकाने बंद आहेत. तालुक्यातील कुडूस येथे पाटील वाईन शॉप असून, मंगळवारी येथे तालुक्यातील नागरिकांनी गर्दी केली.
वाडा पोलीसठाण्यातील एका आरोपीला कोरोनाची लागण झाल्याने २३ पोलिसांना क्वॉरंटाइन केले आहे. यामुळे बंदोबस्तासाठी पोलीस नाहीत. नागरिकांनीच नियमांचे पालन करून स्वत:ची काळजी घ्यावी.
- उद्धव कदम, तहसीलदार, वाडा