उधारी वसुलीसाठी अपहरण; बेदम मारहाण; बारवाल्याची गुंडगिरी, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 15:08 IST2024-01-03T15:08:37+5:302024-01-03T15:08:54+5:30
खून करण्यासाठी अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी बारच्या दोघा गुंडांना अटक केली आहे.

उधारी वसुलीसाठी अपहरण; बेदम मारहाण; बारवाल्याची गुंडगिरी, दोघांना अटक
मीरा रोड : ऑर्केस्ट्रा बारमधील उधारीच्या वसुलीसाठी बारवाल्याने एका ग्राहकाचे अपहरण करून बारमध्ये आणले. बारच्या खोलीत ग्राहकास पट्टा व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना मीरा रोडमध्ये घडली आहे. पोलिसांनी खून करण्यासाठी अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करून बारच्या दोघा गुंडांना अटक केली आहे.
मीरा रोड येथे नरेंद्र वीरेंद्र उपाध्याय (३४) हे राहतात. मॅडोना ऑर्केस्ट्रा बारमध्ये उपाध्याय यांची ५९ हजार रुपयांची उधारी आहे. बारमधील वाहिद मोईनुद्दीन खान (३६), गणेश भगवान पाटील (३३); कमलेश, मोसीन व अन्य ५ ते ६ जण हे उपाध्याय यांच्या राहत्या घराजवळ आले. त्यांना घराबाहेर बोलावले असता रिक्षात कोंबून बारमध्ये आणत मारहाण केली.
हत्या करण्यासाठी अपहरणाचा गुन्हा
मारहाणीत उपाध्याय हे जखमी झाले असून, त्यांच्या फिर्यादीवरून मीरा रोड पोलिस ठाण्यात हत्या करण्यासाठी अपहरण करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ जानेवारीच्या सायंकाळी वाहिद व गणेश या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे, तर बारचा मालक-चालक यांना पोलिसांनी आरोपी केले नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत असून, वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेंद्र चंदनकर हे अधिक तपास करत आहेत.