१२० फूटांवरुन धबधब्यात मारली उडी; जव्हारमधील घटनेत एक बेपत्ता, तर दुसरा गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 06:48 AM2024-05-06T06:48:30+5:302024-05-06T06:48:48+5:30

दाभोसा धबधबा परिसरात मीरा-भाईंदर येथील २४ वर्षीय तीन तरुण मित्र पर्यटनासाठी आले होते. त्यांना येथील पाण्याच्या व डोहाच्या खोलीचा कुठलाच अंदाज नव्हता.

Jump from 120 feet into a waterfall; One is missing and the other is critical in the incident in Jawhar | १२० फूटांवरुन धबधब्यात मारली उडी; जव्हारमधील घटनेत एक बेपत्ता, तर दुसरा गंभीर

१२० फूटांवरुन धबधब्यात मारली उडी; जव्हारमधील घटनेत एक बेपत्ता, तर दुसरा गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : मुंबईतील दोन पर्यटकांनी जव्हार तालुक्यातील दाभोसा धबधब्यात थेट १२० फूट उंचीवरून खोल डोहात उडी मारली. यातील एक पर्यटक बेपत्ता झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

दाभोसा धबधबा परिसरात मीरा-भाईंदर येथील २४ वर्षीय तीन तरुण मित्र पर्यटनासाठी आले होते. त्यांना येथील पाण्याच्या व डोहाच्या खोलीचा कुठलाच अंदाज नव्हता. यातील दोन पर्यटक मित्र थेट धबधबा सुरू होतो त्या उंचीवर पोहोचले, तर तिसरा पर्यटक खाली डोहाजवळून त्यांचा व्हिडीओ काढत होता. 
सध्या धबधब्याला पाणी कमी आहे, धबधब्यावरून पाण्याची धारही कमी आहे. त्यातच माज शेख, जोएफ शेख यांनी अंदाजे १२० फूट उंचीवरून डोहात उडी मारली. यातील माज शेख हा पाण्यातून आलाच नाही. तो बेपत्ता आहे, तर त्याचा मित्र जोएफ शेख कसाबसा पाण्यातून बाहेर आला. मात्र, तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या कमरेला, पायाला, मानेवर जबर मार लागला आहे. 

त्याला कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत, तर माज शेखचा शोध सुरू असल्याची माहिती जव्हार पोलिसांनी दिली.

मुंबई आणि बाहेरगावाहून येणाऱ्या पर्यटकांना येथील धबधब्याच्या खोलीचा अंदाज नसतो. मात्र, हे पर्यटक विनाकारण पाण्यात उडी मारतात किंवा पोहायला उतरतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ते कुठे जातात, काय करतात, याबाबत त्यांनी चौकशी करणे गरजेचे आहे. जेणेकरून अशा दुर्घटना टाळण्यास मदत होईल.
- संजकुमार ब्राह्मणे, पोलिस निरीक्षक, जव्हार पोलिस ठाणे

Web Title: Jump from 120 feet into a waterfall; One is missing and the other is critical in the incident in Jawhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी