भगदाड पाडून ज्वेलर्सचे दुकान लुटले, पोलिस अधिकाऱ्याच्या कार्यालयाजवळच दरोडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 14:21 IST2025-11-10T14:21:27+5:302025-11-10T14:21:38+5:30
Palghar News: पालघर शहरातील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अंबर शॉपिंग मॉलमधील नाकोडा ज्वेलर्स या सराफा दुकानावर शनिवारी रात्री दरोडा पडला आहे. चोरांनी या सराफा दुकानाशेजारी असलेल्या दुकानातून भिंतीला भगदाड पाडून लाखोंचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने लुटून नेले आहेत.

भगदाड पाडून ज्वेलर्सचे दुकान लुटले, पोलिस अधिकाऱ्याच्या कार्यालयाजवळच दरोडा
पालघर - पालघर शहरातील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अंबर शॉपिंग मॉलमधील नाकोडा ज्वेलर्स या सराफा दुकानावर शनिवारी रात्री दरोडा पडला आहे. चोरांनी या सराफा दुकानाशेजारी असलेल्या दुकानातून भिंतीला भगदाड पाडून लाखोंचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने लुटून नेले आहेत.
पालघर रेल्वेस्थानकासमोरच भाजी मार्केटला लागून उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे कार्यालय आणि पोलिस चौकी आहे. या इमारतीमध्ये असलेला सुरक्षारक्षक गायब असून, हा दरोडा सुरक्षा रक्षकाच्या मदतीनेच केल्याचा प्राथमिक अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. दरोड्यादरम्यान घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊ नये म्हणून या दुकानावर असलेल्या सीसीटीव्हीची वायर देखील कापण्यात आली होती. या भागात दिवसरात्र वर्दळ असते. तर पहाटे तीनपासूनच आजूबाजूच्या गावातील शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणि नाशिक येथील भाजीपाला फळ खरेदीसाठी येतात. त्यामुळे त्या आधीच चोरांनी ज्वेलर्सच्या शेजारील कपड्याच्या दुकानात शिरून भिंतीला भगदाड पाडून ज्वेलर्समध्ये प्रवेश केला व तिजोरी कापून सोन्याचे दागिने पळविले.
आरोपींचा शोध सुरू
पहाटेच्या वेळी दरोड्याची माहिती समजताच पालघर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरील बोटाचे ठसे, इतर पुरावे पोलिसांनी घेतले येत आहेत.
किती रुपयांचे सोने चोरीला गेले, याबाबत कुठलीही माहिती समोर आली नसून, आरोपींचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनंत पराड यांनी सांगितले.