जव्हारचे जय सागर धरण कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 23:02 IST2019-06-21T23:02:11+5:302019-06-21T23:02:23+5:30
आठवड्यात पाऊस पडला नाही तर शहर सोडून जाण्याची वेळ

जव्हारचे जय सागर धरण कोरडे
जव्हार : या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जय सागर धरणात अतीअल्प म्हणजेच चार ते पाच दिवस पाणी पुरेल ऐवढाच पाणी साठा शिल्लक आहे. यामुळे जव्हारकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. या आठवड्यात पाऊस पडला नाही तर जव्हार शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण होवून शहरातील नागरिकांना जव्हार शहर सोडून जावे लागेल, अशी स्थिती निर्माण होणार आहे.
पाणी साठा चार ते पाच दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. म्हणून २१, २५, ३० जूनलाच फक्त अर्धा तास पाणी सोडण्यात येईल, असे नगरपरिषदेने शहरात दवंडी देवून जाहीर केले आहे. तसेच नगरपरिषदेने नोटिस काढली आहे. जव्हार शहराला पाणी पुरवठा करणारे जय सागर धरण हे ६० वर्षांपूर्वी संस्थानिक राजे यशवंतराव मुकणे यांनी त्यावेळच्या दोन ते चार हजार लोकांसाठी बांधले होते. मात्र दिवसेंदिवस जव्हार शहराची लोकसंख्या १८ ते २० हजाराच्या आसपास वाढली आहे. त्यातच शहराला लागून रायतळे व कासटवाडी या दोन ग्रामपंचयात क्षेत्रातील अनेक कुटुंबांना याच धरणातील पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष लोकसंख्या वाढल्याने धरणातील पाणी अपुरे पडू लागले आहे. धरणाचे बांधकाम केल्यापासून त्यात साचलेला गाळ काढलेला नाही. म्हणून पाणी साठा कमी होतो, याचा परिणाम आज पाऊस नसल्यामुळे जव्हारकराना भोगावा लागणार आहे. तसेच डॅममधील साचलेला गाळ काढण्यासाठी व डॅमची उंची वाढविण्यासाठी वर्षभरापूर्वी टेंडर काढूनही गाळ काढण्यात आला नाही की, उंचीही वाढविली नाही म्हणून ही वेळ आज जनतेवर ओढावली आहे. त्यामुळे आतातरी तातडीने धरणाची उंची वाढविणे व त्यातील गाळ काढणे ही कामे तातडीने होतील अशी अपेक्षा आहे.
नगरपरिषदेने या जय सागर धरणाकडे वेळीच लक्ष दिले असते, तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. गाळ काढण्याचे टेंडर काढूनही ते व खोलीकरण केले नाही.
- असरफ घाची (चॉईस मास्टर), तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी