विरारमध्ये बेकायदा शुक्राणूंची साठवणूक; पालिकेच्या कारवाईनंतर दोघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 09:26 IST2026-03-14T09:26:16+5:302026-03-14T09:26:52+5:30
विरारच्या पद्मीबाई टॉवरमधील जीवदानी सायंटिफिक कंपनी येथे अवैधरित्या शुक्राणू विक्री करीत असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य विभागाला मिळाली होती.

विरारमध्ये बेकायदा शुक्राणूंची साठवणूक; पालिकेच्या कारवाईनंतर दोघांवर गुन्हा दाखल
नालासोपारा : कुठल्याही नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायाची शैक्षणिक अर्हता नसतानादेखील एक एजन्सी अवैधरित्या दात्यांनी दिलेल्या शुक्राणूंची साठवणूक करून व्यापार करीत असल्याचे वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाला आढळून आले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरारच्या पद्मीबाई टॉवरमधील जीवदानी सायंटिफिक कंपनी येथे अवैधरित्या शुक्राणू विक्री करीत असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानुषंगाने आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी त्या ठिकाणी तपासणी करण्याकरिता वैद्यकीय पथक तयार करून तपासणीचे आदेश दिले.
९ मार्च रोजी वैद्यकीय आरोग्य विभागाच्या पथकाने जीवदानी सायंटिफिक कंपनी येथे तपासणीसाठी भेट दिली असता कंपनी आणि एजन्सी मयूर भागवत संखे व कमलेश शंकर खुत यांच्या मालकीची असल्याचे दिसून आले.
परवानगी नव्हती...
शुक्राणू साठवणुकीचे ठिकाण साहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान अधिनियम २०२१ अंतर्गत एआरटी बँक म्हणून नोंदणीकृत नसल्याने तसेच कायद्याप्रमाणे कुठल्याही नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायाची शैक्षणिक अर्हता नसतानादेखील ही एजन्सी अवैधरित्या शुक्राणू साठवणूक करून व्यापार करीत असल्याचे आढळून आले.