fish prices down; Worldwide demand for fish in satpati | माशांच्या दरात मोठी घसरण; मच्छीमारांची आर्थिककोंडी; सातपाटीतील माशांना जगभरात मागणी
माशांच्या दरात मोठी घसरण; मच्छीमारांची आर्थिककोंडी; सातपाटीतील माशांना जगभरात मागणी

- हितेन नाईक

पालघर : पापलेट (सरंगा) खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही पापलेटच्या दरात सुमाारे ५० ते ५५ रुपयांची घट करत अनेक समस्यांशी झगडत असलेल्या मच्छीमारांचे आर्थिक कंबरडे मोडण्याचे काम केले आहे. व्यापारी खरेदीदार कमी येत असल्याने दर ठरविण्यात स्पर्धा निर्माण होत नसल्याचा फटका मच्छीमारांना बसतो आहे.
संपूर्ण राज्यातील किनारपट्टीवरील सातपाटी हे गाव मत्स्य व्यवसायात पापलेट, दाढा, घोळ, सुरमई आदी माशांच्या उत्पादनासाठी अग्रेसर गाव म्हणून परिचित आहे. दालदा या पारंपरिक मासेमारी पद्धतीने पकडलेल्या माशांचे योग्य ते नियोजन करून वेळीच बर्फ मारून ते साठवणूक करण्याच्या पद्धतीमुळे ताज्या आणि चवीच्याबाबत सातपाटीच्या पापलेटला जगभरात मोठी मागणी असते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सातपाटीमधील मच्छीमार सहकारी संस्था आणि सर्वोदय सहकारी संस्थांनी व्यापारांसोबत ठरवलेला ‘दर’ पश्चिम किनारपट्टीवरील जवळपास सर्वच बंदरात लागू होत असे. मुंबईतील माशांची निर्यात करणाºया कंपनीपैकी चिराग इंटरनॅशनल, अल्लाना फिश, कॅस्टॉल रॉक, हरून अ‍ॅण्ड कंपनी, श्रॉफ इंटरप्रयसेस, चांम फिश आदी अग्रगण्य कंपन्या पावसाळी बंदी उठण्यापूर्वीच सहकारी संस्थांमध्ये टेंडर मिळविण्यासाठी तळ ठोकून रहात असत. दोन्ही सहकारी संस्थांचे संचालक आणि तांडेल प्रमुख एकत्रपणे उघड टेंडर पद्धतीने भाव ठरवीत आपले सर्व मासे या व्यापाºयांनाच देत असत. मासेमारी हंगामाच्या पहिल्या चार महिन्याचा भाव ठरल्यानंतर पुन्हा पावसाळी बंदीपर्यतच्या उर्वरीत महिन्यांसाठी वाढीव दर अशा दोन हंगामासाठी वेगवेगळा भाव ठरविला जात असतो. यावेळी दोन्हीकडून भावाचे योग्य नियोजन केले जात असल्याने अनेक वर्षांपासून व्यापारी आणि मच्छीमारांमध्ये खूपच जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले होते.
१ जून ते ३१ जुलै या पावसाळी बंदी कालावधीनंतर समुद्रात निर्माण होणाºया तुफानी लाटा, वादळी वारे यामुळे संपूर्ण समुद्र घुसळला जातो. यामुळे मत्स्य साठे खोल समुद्रातून ५० ते ७५ नॉटिकल क्षेत्रात सुरक्षित जागेचा आसरा घेत असतात. ही नेमकी जागा शोधून त्यांना आपल्या जाळ्यात पकडण्यासाठी समुद्रात सर्वप्रथम जाण्याची अहमिका मच्छीमारांमध्ये लागलेली असते. कारण पावसाळी बंदी उठल्यानंतर पहिल्या दोन-तीन महिन्यात मिळणारा पापलेट नंतरच्या सहा महिन्यांच्या कालावधीत जवळपास दुर्मिळ होत असल्याने सुरुवातीच्या कालावधीत जास्तीत जास्त मासे पकडून मोठी आर्थिक आवक जमवण्याचे ध्येय प्रत्येक मच्छीमार ठेवीत असतात. त्यामुळे पहिल्या हंगामातील प्रत्येक दिवस मच्छीमारांसाठी महत्त्वपूर्ण असतो.
मागच्या एप्रिल, मे महिन्यात पापलेटच्या लहान पिल्लंची मासेमारी इतर वर्षाच्या तुलनेने कमी प्रमाणात झाल्याचा फायदा होत मच्छीमाराना या मोसमात चांगल्या प्रमाणात वाढ झालेला पापलेट मिळेल, असा विश्वास मच्छीमारांमध्ये होता. परंतु अगदीच १०० ते २०० ग्राम वजनाचे पुरेशी वाढ न झालेले लहान पापलेट मच्छीमारांच्या जाळ्यात येत आहेत.

पहिल्या सीझनमध्ये मिळणारे मुबलक पापलेट यंदा कमी : सातपाटी सर्वोदय सहकारी संस्थेमध्ये एकूण १३२ बोटी असून मासेमारी हंगामाला सुरुवात झाल्यानंतर एकूण फक्त २७ हजार ६६ किलो पापलेट मिळाले असून त्यापैकी २२ हजार २९९ किलो पापलेट हे छोट्या आकाराचे मिळाले आहेत तर मच्छीमार सहकारी संस्थेत ही १० हजार किलो पापलेट मिळाले असून त्यांच्याकडेही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे नेहमीच पहिल्या सिझनमध्ये मिळणारे मुबलक पापलेट यावेळी खूप कमी प्रमाणात मिळत असल्याने ८ ते १० लाखांचे कर्ज डोक्यावर घेऊन मासेमारीला उतरलेले मच्छीमार बांधव धास्तावले आहेत.

नुकसान भरून काढण्यासाठी सहकारी संस्थांचे पदाधिकारी प्रयत्नशील
गेल्यावर्षी व्यापाºयांकडून दरात साधारणपणे १७१ रुपयांची कपात केली होती. त्यासाठी मागच्या वर्षीचे आमचे मासे अजून शिल्लक असून डॉलरचा भाव घसरणे, मासे आयात करणाºया चीनशी दुरावत चाललेले संबंध आदी कारणे दिली होती. यंदा अशी परिस्थिती नसतानाही व्यापाºयांनी दरात केलेली कमतरता मच्छीमारांच्या जीवावर उठणारी आहे. त्यातच पापलेट माशांची खरेदी करणाºया विश्वासू व्यापाºयांची संख्या कमी होत असल्याचा फायदा त्यांना होत असून आर्थिक फटका मात्र मच्छीमारांना सहन करावा लागतो आहे. १० दिवसांत मच्छीमारांचे सुमारे २२ ते २५ लाखांचे नुकसान झाले असून ते भरून काढण्यासाठी दोन्ही सहकारी संस्थांचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

व्यापाºयांची संख्या कमी झाल्याने दर ठरविताना स्पर्धा निर्माण होत नाही. याचा मोठा आर्थिक फटका मच्छीमारांना बसत आहे.
- जयप्रकाश मेहेर, अध्यक्ष,
कव-दालदा संघर्ष समिती

संस्थांच्या सर्व बोटधारकाना योग्य दर मिळावा म्हणून आम्ही संचालक नेहमीच प्रयत्नशील असतो. शासनाने शेतकºयाप्रमाणे आम्हालाही हमी भाव द्यावा.
- पंकज म्हात्रे, व्यवस्थापक,
सर्वोदय सहकारी संस्था

राज्यातील किनारपट्टीवरील सातपाटी हे गाव मत्स्य व्यवसायात पापलेट, दाढा, घोळ, सुरमई आदी माशांच्या उत्पादनासाठी म्हणून परिचित आहे.


Web Title: fish prices down; Worldwide demand for fish in satpati
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.