पहिला राष्ट्रध्वज ३३ गडांवर फडकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 05:28 IST2017-08-10T05:28:56+5:302017-08-10T05:28:56+5:30
पालघर जिल्ह्यातील ३३ किल्ल्यांवर भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजास दुर्गमित्र मानवंदना देणार आहेत. दोन दिवस चालणाºया या मोहिमेची सुरुवात येत्या शनिवारी वसई किल्ल्यातील चिमाजी अप्पा स्मारकातून करण्यात येणार आहे.

पहिला राष्ट्रध्वज ३३ गडांवर फडकणार
शशी करपे
वसई : पालघर जिल्ह्यातील ३३ किल्ल्यांवर भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजास दुर्गमित्र मानवंदना देणार आहेत. दोन दिवस चालणाºया या मोहिमेची सुरुवात येत्या शनिवारी वसई किल्ल्यातील चिमाजी अप्पा स्मारकातून करण्यात येणार आहे.
किल्ले वसई मोहिम परिवाराने भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजाच्या स्मृती जपण्यासाठी व त्याला मानवंदना देण्याची मोहिम २००७ सालापासून सुरु केली आहे. यंदा यंदा त्याला ११० वर्षे पूर्ण होत आहे.
वसई किल्ला, अर्नाळा किल्ला, वज्रगड, आगाशी कोट, मांडवी कोट, तुंगार दुर्ग, दहिसर कोट, घोडबंदर कोट, पारगाव कोट, विराथन कोट, दातिवरे बुरुज, हिरा डोंगरी दुर्ग, कोरे कोट, एडवण कोट, मथाणे कोट, भवानीगड, दांडा कोट, कित्तल कोट, केळवे कोट, तारापूर किल्ला, डहाणू किल्ल्यांवर त्याचा जयजयकार होईल. ३३ गडकोटांच्या प्रत्यक्ष भेटीच्या निमित्ताने त्या गडकोटांच्या प्राचीन व ऐतिहासिक इतिहासाला साद घालण्याची संधी दुर्ग प्रेमींना मिळणार आहे. दोन दिवसांच्या मोहिमेत इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत मार्गदर्शन करणार आहेत.
जगातील सर्व राष्ट्रांचे स्वत:चे राष्ट्र्ध्वज असून त्यांना जनमानसात स्वतंत्र मान आणि आदर आहे. भारतीयांनी ध्वज ही संकल्पना राबवली त्यावेळी तिरंगा ध्वज नव्हता. त्याला एका शतकापूर्वीची पार्श्वभूमी आहे.
२२ आॅगस्ट १९०७ रोजी जर्मनमधील स्टुटगार्ट शहरात जागतिक समाजवादी परिषद भरली होती. त्यावेळी भारताच्या प्रतिनिधी म्हणून मादाम कामा हजर होत्या. मादम कामांनी युनियन जॅक न घेता आपल्या कल्पनेने साकार केलेला स्वतंत्र ध्वज भारताचा म्हणून सादर केला.
मादाम कामा यांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेत फडकवलेला ध्वज आद्य राष्ट्रध्वज मानला जातो. आॅगस्ट १९३७ मध्ये या ध्वजाचे भारतात आगमन झाले. पुण्यात पोचल्यानंतर राष्ट्रध्वजाची मिरवणूक काढण्यात आली होती. केसरीवाडा ते पुणे रेल्वे स्टेशन मार्गावर निघालेल्या मिरवणुकीत स्वातंत्र्यवीर सावकरही सहभागी झाले होते. ध्वजाच्या आरेखनात सावकरांचे योगदान होते. आजही हा ध्वज पुण्यात केसरीवाड्यात ठेवण्यात आलेला आहे.