मीरा भाईंदरमध्ये पहाटेपर्यंत फोडले जात होते फटाके, प्रदूषणा मुळे हवा दुषित; दोन दिवसात २२ ठिकाणी आगीच्या घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 16:29 IST2025-10-22T16:29:26+5:302025-10-22T16:29:55+5:30
एकीकडे केवळ ग्रीन फटाके फोडण्यास मुभा असून फटाके फोडण्याची वेळ सकाळी ६ ते ७ आणि रात्री ८ ते १० इतकी घालुन दिलेली आहे. शिवाय शांतता क्षेत्रात व परिसरात १०० मीटर दरम्यान फटाके फोडण्यास मनाई आहे.

मीरा भाईंदरमध्ये पहाटेपर्यंत फोडले जात होते फटाके, प्रदूषणा मुळे हवा दुषित; दोन दिवसात २२ ठिकाणी आगीच्या घटना
मीरारोड- फटाके फोडण्याच्या वेळेची मर्यादा रात्री १० वाजे पर्यंत असताना मीरा भाईंदर मध्ये मात्र पहाटे पर्यंत प्रचंड आवाज आणि प्रदूषण करणारे फटाके पोलिसांच्या नाका खाली फोडले जात आहेत. त्यातच फटाक्यांच्या प्रदूषणा मुळे शहराची हवेची गुणवत्ता अतिशय वाईट झाली असून फटाक्यांमुळे शहरात दोन दिवसात २२ ठिकाणी आगी लागल्या आहेत.
एकीकडे केवळ ग्रीन फटाके फोडण्यास मुभा असून फटाके फोडण्याची वेळ सकाळी ६ ते ७ आणि रात्री ८ ते १० इतकी घालुन दिलेली आहे. शिवाय शांतता क्षेत्रात व परिसरात १०० मीटर दरम्यान फटाके फोडण्यास मनाई आहे. कांदळवन व ५० मीटर बफर झोन, इको सेन्सेटिव्ह झोन, वन हद्दीत देखील फटाके फोडण्यास मनाई आहे.
परंतु यंदाच्या दिवाळीत महापालिका आणि पोलिसांच्या फटाके विक्रेत्यांशी झालेल्या संगनमताने कायदे - नियम व शासन आणि न्यायालय आदेश धाब्यावर बसवून रस्त्या लगत निवासी क्षेत्र, गर्दीच्या ठिकाणी सर्रास नियमबाह्य फटाके स्टॉल विक्रीला परवानग्या देण्यात आल्या आहेत. हवा आणि ध्वनी प्रदूषण कमी होईल याची काळजी घेण्या ऐवजी महापालिका व पोलिसांनी प्रदूषण करणारे आणि लोकांच्या जीवित - मालमत्तेला धोक्यात आणून फटाके विक्रीस मोकळीक दिली असल्याची टीका होत आहे.
फटाके फोडण्याची मर्यादा असताना देखील मीरा भाईंदर मध्ये सोमवारी, मंगळवारी दिवाळीच्या दोन्ही दिवशी तसेच बुधवारच्या पहाटे पर्यंत फटाके फोडले जात होते. शांतता क्षेत्र सह प्रतिबंधित क्षेत्रात पहाटे पर्यंत कानठळ्या बसवणारे आणि प्रचंड धूर करणारे फटाके फोडले गेले. पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने शहरातील लाखो लोकांना याचा त्रास सहन करावा लागला. रुग्ण, वृद्ध, लहान बालके पासून सामान्य लोकांना फटाक्यांच्या आवाज मुळे झोप मिळाली नाही. कानठळ्या बसवणारे आवाज आणि धुराच्या जाच आरोग्याला त्रासदायक ठरला. अनेकाना खोकला, श्वास घेण्यास त्रास झाला.
फटाक्यांच्या प्रदूषणा मुळे शहरातील हवेत सर्वत्र घातक विषारी धुराचे थर साचलेले दिसून आले. रात्रीच्या वेळी तर हवा आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरली. धुरा मुळे अनेकांना श्वास घेणे अवघड जात होते. नाईलाजाने लोकांना प्रदूषित धूर श्वासा द्वारे घ्यावा लागला. प्रदूषण नियंत्रण मंडळाने तर शहराच्या बाहेर मोकळ्या मैदानात हवेची गुणवत्ता मोजणारी यंत्रणा बसवण्याची चलाखी केली आहे. मात्र सर्वत्रच हवेची गुणवत्ता अतिशय खराब झालेली होती.
फटाक्यांची मोकळीक असल्याने सोमवारी आणि मंगळवारी २२ ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. अग्निशमन दलाने दिलेल्या आकडेवारी नुसार २२ घटनां मध्ये मुख्यत्वे कचऱ्याचे ढीग, काही घरे व गोदामचा समावेश आहे. भाईंदर पूर्वेच्या जेसल पार्क खाडी किनारी कांदळवन क्षेत्रात तर प्रचंड प्रमाणात मध्यरात्री नंतर देखील फटाके फोडले जात होते. विशेष म्हणजे येथे नवघर पोलीस चौकी तसेच सहायक पोलीस आयुक्त कार्यालय देखील आहे.