नवरात्रीचा उपास, तरी चिकन खायचा हट्ट; आईची लाटण्याने मारहाण, चिमुकला दगवला, मुलगी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 17:14 IST2025-09-28T17:12:36+5:302025-09-28T17:14:35+5:30
तिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती, जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिली.

नवरात्रीचा उपास, तरी चिकन खायचा हट्ट; आईची लाटण्याने मारहाण, चिमुकला दगवला, मुलगी जखमी
हितेन नाईक, पालघर:- चिकन लॉलीपॉप खाण्यासाठी आईकडे हट्ट धरणाऱ्या दोन मुलांना नवरात्रीचा उपवास असल्याने नकार दिला.मात्र दोन्ही मुलांनी अधिक आग्रह धरल्याने जन्मदात्री आई पल्लवी धुमडे (वय ४० वर्ष) हिने हातातील लाटण्याने आपल्या ७ वर्षीय मुलगा आणि १० वर्षीय मुलीला जोरदार मारहाण केली.ह्या घटनेत चिन्मय ह्या ७ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला.तर लव्या ही मुलगी रुग्णालयात उपचार घेत आहे. याप्रकरणी पालघर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून तिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती, जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिली.
पालघर - सातपाटी रस्त्यावरील काशीपाडा मधील घोडेला कॉम्प्लेक्स,शाम रिजेन्सी मध्ये आरोपी आई पल्लवी धुमडे (वय ४० वर्ष) ह्या आपल्या चिन्मय (वय ७ वर्ष) आणि लव्या (१० वर्ष) ह्या दोन मुला सोबत आपल्या बहिणीकडे राहत होती.आपल्या पतीशी पटत नसल्याने काही महिन्यापूर्वी भाईंदर येथून ती काशीपाडा येथे राहण्यास आली होती.शुक्रवारी रात्री चिन्मय आणि लव्या ह्या दोन्ही मुलांनी आई कडे चिकन लॉलीपॉप खाण्यासाठी हट्ट धरला.मात्र सध्या नवरात्रीचे उपवास असल्याने माझा उपवास आहे त्यामुळे चिकन लॉलीपॉप मिळणार नाही असे आईने सांगितले.त्यावर दोन्ही मुलांनी आईकडे अधिक आग्रह धरल्याने आरोपी आई ला रागावर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याने तिने संतापून घरातील लाकडी लाटण्याने दोन्ही मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
ह्या मारहाणीत चिन्मय ह्याच्या डोक्याला झालेली मारहाण त्याच्या वर्मी लागल्याने त्याचा मृत्यू झाला.तर मुलगी ही जखमी झाल्याने तिला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पालघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी दिली. ह्या प्रकरणी आरोपी आई पल्लवी हिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक देशमुख यांनी सांगितले.