‘ग्रॅनी क्लाऊड’चे इंग्रजी धडे; वाड्यात राज्यातील पहिला प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 23:48 IST2018-12-08T23:47:28+5:302018-12-08T23:48:12+5:30
क्वेस्ट आणि विवेकनगर शाळेचा संयुक्त उपक्रम

‘ग्रॅनी क्लाऊड’चे इंग्रजी धडे; वाड्यात राज्यातील पहिला प्रयोग
वाडा : मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण इंग्रजी भाषा शिकता यावी, सफाईदारपणे लिहिता व बोलता यावी या करिता गुणवत्तापूर्ण शिक्षणावर काम करणाऱ्या क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट (क्वेस्ट) व येथील जिल्हा परिषद शाळा विवेकनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रॅनी क्लाऊड या इंग्रजी भाषा शिक्षणाच्या उपक्र माचे उद्घाटन गुरु वारी क्वेस्टच्या अर्चना कुलकर्णी व नगरसेवक मनिष देहरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
हा उपक्रम जि. प.च्या शाळेसोबत राबविला जाणारा राज्यातील पहिलाच प्रयोग असून या उपक्र मासाठी पालकांनी लोकवर्गणीतून निधी उभा केला आहे. क्वेस्टच्या माध्यमातून या शाळेत बालभवन हा भाषा व गणित शिक्षणाचा कार्यक्र म सुरु असून मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे इंग्रजी भाषेचे शिक्षण मिळावे या उद्देशाने ग्रॅनी क्लाऊड हा उपक्रम सुरु करण्यात आला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन व या उपक्र मासाठी विशेष मदत करणाºया नगरसेवक मनीष देहरकर यांच्या वाढिदवसाचे औचित्य साधून उपक्र माचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलतांना कुलकर्णी म्हणाल्या की, जगभरात झालेल्या सर्वेक्षणात मातृभाषेत शिक्षण घेतल्यास मुलं अधिक चांगल्याप्रकारे प्रगती करतात हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे मराठी माध्यमात आपली मुलं टाकल्याने त्यांनी पालकांचे विशेष कौतुक केले. इंग्रजी भाषा येणे ही काळाची गरज असून ती प्रत्येक विद्यार्थ्यांला येणे आवश्यक आहे.
केवळ इंग्रजी वाचता येण्याऐवजी आकलनपूर्ण इंग्रजी भाषा विद्यार्थ्याला आली तरच विद्यार्थी अधिक समृद्ध होतील असे म्हणत क्वेस्टच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या उपक्र मांची माहिती निवृत्त शिक्षणाधिकारी एस. एस. पाटील ेयांनी दिली. कार्यक्र मास शिक्षणाधिकारी जयवंत खोत, स्टेट बँकेचे माजी व्यवस्थापक गुणानाथ भोईर, शिक्षण विस्त्तार अधिकारी विजय बराथे, कृष्णा जाधव, क्वेस्टचे प्रोजेक्ट आॅफिसर नितीन विशे, केंद्रप्रमुख मोहन सोनवणे, सूर्यकांत ठाकरे, वैभव पालवे, दिनेश यादव आदी उपस्थित होते. कार्यक्र माचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका रश्मी गोतारणे यांनी केले.
पालकांनीही उभारला निधी, देहरकरांनी दिला स्मार्ट टीव्ही
ग्रॅनी क्लाऊड हा इंग्रजी भाषा शिक्षणाचा उपक्र म शाळेत सुरू करावा अशी पालकांनी क्वेस्टचे संचालक नीलेश निमकर यांच्याकडे मागणी केली होती. क्वेस्ट या शाळेत विनामूल्य बालभवन चालवत असून त्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतीही फी आकारत नाही. त्यामुळे ग्रॅनी क्लाऊडसाठी पालकांनी निधी उभारावा अशी सूचना त्यांनी केली. या उपक्र मासाठी स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, इंटरनेट सुविधा, वेबकॅमेरा आदी साहित्य खरेदी करणे आवश्यक होते. त्यासाठी सुमारे ६० हजार रुपयांची गरज होती. म्हणून पालकांनी आर्धी लोकवर्गणी काढली.उर्वरित मदत नगरसेवक देहरकर यांनी केली.