ई-पुस्तके ही आजच्या काळाची गरज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 06:13 IST2019-10-23T00:56:33+5:302019-10-23T06:13:47+5:30
प्रत्येकाने व्यक्त होणे गरजेचे; पुरु षप्रधान संस्कृतीची पकड कायम

ई-पुस्तके ही आजच्या काळाची गरज
ठाणे : ई-पुस्तके ही आजच्या काळाची गरज असून त्यामुळे जगभरातील जास्तीतजास्त लोकांपर्यंत आपले लिखाण पोहोचवता येते. त्यामुळे आजच्या प्रकाशन संस्थांनीही त्याकडे सकारात्मकपणे पाहावे, असा सल्ला विश्वकोश निर्मिती मंडळाच्या माजी अध्यक्षा, ज्येष्ठ लेखिका डॉ. विजया वाड यांनी दिला. आज प्रत्येकाने व्यक्त होणे फार गरजेचे आहे. अव्यक्त राहून आपण मनात बऱ्याच आढ्या घेऊन जगतो आणि त्याचा आपल्यालाच त्रास होतो, असेही त्या म्हणाल्या.
शारदा प्रकाशनतर्फे मराठी ग्रंथसंग्रहालय येथे कवयित्री प्रज्ञा पंडित यांचे ‘व्यक्त अव्यक्त’ आणि ‘काव्य लिपी’ हे काव्यसंग्रह, कवी चारुदत्त मुंढे यांचा ‘इंद्रधनुष्य’ हा काव्यसंग्रह आणि लेखिका शकुंतला चौधरी लिखित ‘आली वादळे तरीही’ या कादंबरीचे प्रकाशन डॉ. वाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून त्या म्हणाल्या, एकविसाव्या शतकातही पुरु षप्रधान संस्कृतीने स्वत:ची पकड ढिली होऊ दिलेली नाही. आजही अनेक स्त्रियांचे चूल, मूल आणि संसाराचा गाडा हाकण्यात उभे आयुष्य खर्च होते. या सर्व जबाबदाºया सांभाळून स्त्रियांनी जिथे जसे जमेल तसे स्वत:ला व्यक्त करण्याची आज नितांत गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
प्रमुख पाहुण्या डॉ. शारदा निवाते म्हणाल्या की, आजची स्त्री ही माघार घेताना दिसत नाही. घडणाºया प्रत्येक घटनेवर, समाजातल्या रूढी-परंपरांवर ती व्यक्त होते आणि गरज पडल्यास लढतेही. ही खरेच स्वागतार्ह गोष्ट आहे. कवीला कोणताही विषय वर्ज्य वाटत नाही किंबहुना आजूबाजूला घडणारी प्रत्येक संवेदनशील घटना कवीच्या जीवाला चटका लावून जाते आणि त्यातूनच कविता जन्माला येते. या सोहळ्यात कवी समाधान मोरे यांना ‘विश्वविजय’ या काव्यसंग्रहासाठी आणि कवी नवनाथ रणखांबे यांना ‘जीवनसंघर्ष’ या काव्यसंग्रहासाठी साहित्यसेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
काव्यलेखन स्पर्धेचा निकाल : आॅल इंडिया पोएट्री असोसिएशन आणि तेजस्वी अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेत कवी काळुदास कनोजे आणि सचिन गुप्ता हे उत्तेजनार्थ पुरस्काराचे मानकरी ठरले, तर कवयित्री सुलभा वासुदेव ढोके-जुवाटकर, शिल्पा नायर आणि किशोरी शंकर पाटील यांना अनुक्र मे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्र मांकाची पारितोषिके मिळाली. कार्यक्र माचे निवेदन कवी मनीष पंडित यांनी केले.