वाड्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने वाडा शहर ७ मेपर्यंत पूर्ण बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 13:34 IST2020-05-02T13:34:11+5:302020-05-02T13:34:23+5:30
गडचिंचले हत्याकांडातील एक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह

वाड्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने वाडा शहर ७ मेपर्यंत पूर्ण बंद
वाडा: पालघरमधील गडचिंचले गावात दोन साधू आणि चालकाच्या हत्या प्रकरणातील एका ५५ वर्षीय आरोपीचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या आरोपीच्या संपर्कात आलेल्या आरोपींसह पोलीस कर्मचाऱ्यांना कॉरंटाईन करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरु असून संपर्कातील आरोपींना न्यायलयाच्या परवानगीने कॉरंटाईन करण्यात येणार आहे. या रुग्णाला वैद्यकीय उपचाराकरिता पालघरच्या ग्रामीण रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून त्याच्या संपर्कात आणखी किती लोक आले आहेत याचा शोध प्रशासन घेत आहे.
पालघरमधील गडचिंचले गावात जमावाने केलेल्या साधू आणि चालकाच्या हत्या प्रकरणात कासा पोलीसांनी ११० आरोपींना अटक केली होती पैकी ९ अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधार गृहात ठेवण्यात आले आहे तर उर्वरित आरोपींपैकी २२ आरोपींना वाडा पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यापैकी एका आरोपीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे अहवालातून पुढे आले आहे. वाड्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले असून आजपासून ७ मे पर्यंत वाडा शहर सील करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती वाडा तहसिलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली.